Sun, Aug 25, 2019 20:11होमपेज › Goa › राज्यातील ४२ किनार्‍यांवर चतुर्थीकाळात‘द‍ृष्टी’ची नजर

राज्यातील ४२ किनार्‍यांवर चतुर्थीकाळात‘द‍ृष्टी’ची नजर

Published On: Sep 12 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 12:25AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील 42 समुद्रकिनार्‍यांवर गणेश चतुर्थीपासून विसर्जनप्रसंगी 13 ते 23 सप्टेंबरपर्यंत ‘द‍ृष्टी’कडून जीवरक्षक तैनात केले जाणार आहेत. आपत्कालीन स्थितीसाठी द‍ृष्टीने अतिरिक्‍त जीवरक्षक व वाहनांची तरतूद केली आहे. गणेश चतुर्थी काळात समुद्र किनार्‍यांवर तैनात केले जाणारे जीवरक्षक हे आपल्या निर्धारित तासांपेक्षा अधिक वेळ काम करतील, असे सूत्रांनी सांगितले.

गोव्यात दीड, पाच, सात, नऊ तसेच अकरा दिवसांचे गणपती घरोघरी पूजले जातात. गणपतीच्या आगमनावेळी जितका  उत्साह असतो, तितकाच उत्साह  विसर्जनावेळीही गणेशभक्‍तांमध्ये असतो.  त्यामुळे विसर्जनावेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी  ‘द‍ृष्टी’कडून   उत्तर व  दक्षिण गोव्यातील मिळून  42 समुद्रकिनार्‍यांवर जीवरक्षक तैनात केले जाणार आहेत.  

गणेश चतुर्थीकाळात लोकांना विसर्जनावेळी संपूर्ण रात्रभर समुद्र किनार्‍यांवर तैनात करण्यात आलेले  जीवरक्षक लोकांना गणपती विसर्जित करून त्यांना व्यवस्थित किनार्‍यापर्यंत यायला मदत करणार आहेत. समुद्र जर खवळलेला असेल तर पूजा केल्यानंतर जीवरक्षक स्वत: पाण्यात उतरून गणपती मूर्ती विसर्जित करणार आहेत. गणेश भक्‍त समुद्रकिनार्‍यांवर उभारण्यात येणार्‍या कक्षात जाऊन  जीवरक्षकांशी किंवा जीवरक्षक टॉवरशी संपर्क साधू शकतात. 

पाण्याला ओहोटी असली तरीही  विसर्जनासाठी  पाण्यात रात्रीच्यावेळी उतरु नये,  असे आवाहन   दृष्टीकडून करण्यात आले आहे. याशिवाय सणांचा आनंद लुटण्यासाठी  पर्यटकांकडून  मद्यपान करुन पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला जातो. पर्यटकांनीदेखील त्याबाबत खबरदारी घ्यावी, असेही दृष्टीतर्फे कळवण्यात आले आहे.