Thu, Feb 21, 2019 16:01होमपेज › Goa › अनधिकृत घरे नियमित करण्यास ३१ मार्चपर्यंत संधी : पर्रीकर

अनधिकृत घरे नियमित करण्यास ३१ मार्चपर्यंत संधी : पर्रीकर

Published On: Feb 08 2018 1:44AM | Last Updated: Feb 07 2018 11:17PMपणजी : प्रतिनिधी

स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर अनधिकृतपणे घरे उभारणार्‍यांना सदर बांधकाम नियमित करण्यासाठी शुल्क  भरणा करण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंतच असेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. यापुढे  मुदतवाढ मिळणार नाही,असेही ते म्हणाले. 

पर्वरी येथील मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक पार पडल्यानंतर  पत्रकार परिषदेत पर्रीकर म्हणाले, की बेकायदा घरे नियमित करण्याची अधिसूचना आल्यानंतर ज्या लोकांनी आपले बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज केला आहे, त्यानांच ही मुदत दिली जाणार आहे.  असे सुमारे 5ते 6 हजारांच्या आसपास अर्ज सरकारकडे आले असून या लोकांना सदर बांधकाम नियमित करण्यासाठी 31 मार्च 2018 ही अंतिम मुदत राहणार आहे. मात्र या योजनेचा फायदा घेण्यासाठी नव्याने अर्ज करणार्‍यांना या मुदतीचा फायदा मिळणार नाही. 

सदर योजनेला आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच ही योजना सध्या फक्‍त स्वत:च्या मालकीच्या जागेेतील बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यार्‍यांसाठीच उपलब्ध आहे. काही घरे स्थानिक पंचायत, नगरनियोजन खाते आदीं खात्याचे परवाने न घेता अथवा कृषी क्षेत्रात बेकायदेशीररीत्या बांधले जात असल्याने त्यांना नियमित करण्यासाठी या योजनेचा फायदा घेता येणार आहे. मात्र सरकारी अथवा कोमुनिदादच्या मालकीच्या जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामावर आणखी 2-3 महिन्यांनी  निर्णय घेतला जाणार असल्याचेही पर्रीकर यांनी सांगितले.