Mon, May 20, 2019 18:20होमपेज › Goa › राज्यात क्षयरुग्णांची वाढती संख्या चिंताजनक

राज्यात क्षयरुग्णांची वाढती संख्या चिंताजनक

Published On: Mar 25 2018 1:47AM | Last Updated: Mar 25 2018 12:36AMवाळपई : प्रतिनिधी

राज्यात क्षय रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी  सहकार्य करावे, असे आवाहन जागतिक आरोग्य मंडळाच्या गोवा राज्याचे प्रभारी डॉक्टर नवले  यांनी केले. जागतिक  क्षयरोग दिनानिमित  राज्य सरकारच्या पुढाकाराने क्षयरोग मोबाईल व्हॅनचे उद्घाटन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले. खडकी सत्तरी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2025 पर्यंत  देश क्षयरोगमुक्त  करण्याचा संकल्प सोडला असून यासाठी वेगवेगळ्या स्तरावर करण्यात येणार्‍या उपक्रमांत लोकांनी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

डॉ. नवले पुढे म्हणाले की,   देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील क्षय रुग्णांची संख्या जास्त असून याचे प्रमाण 24 टक्के आहे. राज्यातील क्षय रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आरोग्य खाते पूर्णपणे सक्रिय बनल्याचेही ते म्हणाले. यासाठी राज्यातील जनतेने सहकार्य करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प पूर्ण होण्यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही  डॉ. नवले यांनी सांगितले. 

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी  सांगितले की, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील क्षय रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना लवकरच करण्यात येणार आहे. सध्या लोकार्पण करण्यात आलेली  मोबाईल व्हॅन राज्याच्या वेगवेगळ्या ग्रामीण तसेच शहरी भागात  फिरणार आहे.  रुग्णांच्या थुंकीचा तपास करून त्यांच्यावर उपचार केले जातील. लोकांना अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करुन देणारे गोवा पहिले राज्य ठरणार आहे. या सेवेचा लोकांनी फायदा घ्यावा, असे आवाहनही मंत्री राणे यांनी केले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते  फित कापून मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. 

याप्रसंगी आरोग्य खात्याचे संचालक  डॉक्टर संजय दळवी, सरपंच  ओमप्रकाश बर्वे, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे, पंच सदस्य संतोष गावकर, विश्वासराव राणे, शिवाजी देसाई, विनोद शिंदे, व इतरांची खास उपस्थिती होती.

Tags : increasing number,  TB patient, worrisome, says, Dr. Navale, Goa news