Tue, Mar 26, 2019 11:50होमपेज › Goa › मुरगाव पालिकेतून अमोनिया टाकीची फाईल गायब

मुरगाव पालिकेतून अमोनिया टाकीची फाईल गायब

Published On: Jan 31 2018 12:16AM | Last Updated: Jan 31 2018 12:06AMदाबोळी : प्रतिनिधी

मुरगाव पालिकेतून अमोनिया टाकीची फाईल गायब झाल्याने नगरसेवकांनी मंगळवारी बैठकीत गदारोळ माजवला. यामागे पालिका प्रशासनाचा छुपा  अजेंडा असल्याचा ठपका ठेवून सर्व नगरसेवकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.

पालिका मंडळाची मंगळवारी अर्थसंकल्पासंदर्भात बैठक बोलविण्यात आली होती. तत्पूर्वी आठ दिवसांपूर्वी चिखली राष्ट्रीय महामार्गावर अमोनिया टँकर उलटून झालेल्या अपघातावर चर्चा करण्यात आली. यात सर्व नगरसेवकांनी मुरगाव बंदरात जेटी येथे असलेली अमोनिया टाकी तेथून हलविण्यात यावी, कोणत्याही परिस्थितीत वास्कोतून होणारी अमोनिया वाहतूक बंद करावी, अशी मागणी करून टाकी तेथून हटविली तर आपोआप वास्को शहरातून अमोनिया वाहतूक बंद होईल, असे मत मांडले. अपघातानंतर पालिकेने सदर वाहतूक बंद करण्यासाठी झुआरी कंपनीला नोटीस बजावली होती, तरीही अमोनिया वाहतूक शहरातून होत असल्याने बैठकीत हा विषय बराच गाजला. 

‘कंपनीला नोटीस पाठवूनही वाहतूक सुरूच’

अमोनिया टँकर उलटून वायू गळती झाल्यानंतर  झुआरी कंपनीला पालिकेकडून ही रासायनिक वाहतूक शहरातून बंद करण्यासाठी नोटीस पाठवली होती, पण दोन दिवस सदर टँकर वाहतूक बंद ठेवून ‘परत येरे माझ्या मागल्याची भूमिका’ कंपनीने घेतली आहे. आज आम्ही त्या टाकीची फाईल शोधतो तर ती गायब आहे. याविषयी मुख्याधिकार्‍यांना जातीने लक्ष घालण्याची विनंती करणार आहे, असे नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी सांगितले.