Tue, Jun 25, 2019 15:08होमपेज › Goa › खाण अवलंबितांसोबत उद्या अमित शहा यांची बैठक 

खाण अवलंबितांसोबत उद्या अमित शहा यांची बैठक 

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 1:32AM
पणजी : प्रतिनिधी

केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या मध्यस्थीमुळे  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा खाण अवलंबितांसोबत येत्या 13 जानेवारीला (रविवारी)  बैठक घेणार आहेत. गोव्याचे तिन्ही खासदार या बैठकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे नेते पुती गावकर यांनी दिली. 

मंचचे नेते पुती गावकर म्हणाले की, आपल्यासह खाण अवलंबितांचे एकूण चार प्रतिनिधी दिल्लीत शहा यांच्यासोबतच्या बैठकीसाठी जाणार आहेत. वास्तविक आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक हवी आहे. पण शहा यांच्यासोबत बैठक होईल तेव्हा आम्ही मोदी यांच्या भेटीबाबतचा विषय त्यांच्यासमोर मांडू शकू. गोव्यातील खनिज खाणी लवकर सुरू केल्या जाव्यात, ही आमची एकमेव मागणी आहे. शहा त्याविषयी काय सांगतात ते आम्ही ऐकून  घेऊ. 

खासदारांकडूनही शहांना विनंती

दिल्लीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याचे  तिन्ही  खासदार विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, श्रीपाद नाईक यांनी शहा यांना बैठक घेण्याची विनंती केली व त्यांनी ती मान्य केली. तिन्ही खासदार सध्या भाजपच्या राष्ट्रीय मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने सध्या दिल्लीत आहेत.