Sun, Mar 24, 2019 05:02होमपेज › Goa › साखळीत 1 जूनपासून कृषी महोत्सव 

साखळीत 1 जूनपासून कृषी महोत्सव 

Published On: May 19 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 11:11PMडिचोली : प्रतिनिधी

रवींद्र भवन आणि कृषी खात्याच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 3 जून दरम्यान साखळीतील रवींद्र भवनात उत्तर गोवा पातळीवर भव्य कृषी महोत्सव तथा प्रदर्शनाचे आयोजन  करण्यात आल्याची माहिती  सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.सावंत पुढे म्हणाले की, कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञावर आधारित माहिती तसेच विविध विषयांवर आधारित प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. यासंदर्भात साखळी मतदारसंघातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत सदस्य  तसेच शेतकरी वर्गाच्या उपस्थितीत कृषी खात्याचे नेल्सन फिग्रेओ, किशोर भावे यांची नुकतीच बैठक घेऊन कृषी महोत्सवाची रूपरेषा निश्‍चित करण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले. 

1 जून रोजी कृषी महोत्सवात उद्घाटन होणार आहे. त्यानंतर 2 व 3 जून रोजी शेतकर्‍यांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रे होतील. यात प्रामुख्याने शेतीविषयक आधुनिक माहिती, गोव्यातील  शेतीबाबत माहिती प्रदर्शन, चर्चासत्रे होतील. या कृषी महोत्सवात विविध स्टॉल उभारले जाणार आहेत. या स्टॉल्सच्या माध्यमातून शेतकरी वर्ग तसेच स्वयंसहाय्य गटांना आपला माल  विकता येईल, असेही ते म्हणाले.
शेतकर्‍यांच्या शेत मालाला  चांगला बाजारभाव मिळावा, शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन विकण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे सावंत म्हणाले. यावेळी उन्नती सहस्रबुद्धे , मनिला गवस, खुशाली नाईक, राजन फाळकर, विश्‍वंभर गावस, भोला  खोडगीणकर, केदार घाडी, शारदा मलिक, दुर्गादास नाईक, संदेश नाईक, गोविंद गावकर, विनिता घाडी, शारदा मलिक आदी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी सूचना मांडल्या.