Wed, Jan 16, 2019 21:41होमपेज › Goa › त्रिसदस्यीय समिती घटनाबाह्य शांताराम नाईक यांची टीका  

त्रिसदस्यीय समिती घटनाबाह्य शांताराम नाईक यांची टीका  

Published On: Mar 06 2018 1:03AM | Last Updated: Mar 06 2018 1:03AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या गैरहजेरीत निर्णय घेण्यासाठी  नेमलेली मंत्र्यांची त्रिसदस्यीय समिती  म्हणजे राज्याला तीन मुख्यमंत्री का, असा प्रश्‍न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शांताराम नाईक यांनी पणजीत पत्रकार परिषदेत केला. पर्यायी व्यवस्था म्हणून समिती स्थापणे हा प्रशासकीय घोटाळा असून अशा प्रकारची तरतूद घटनेत नसल्याने ही कृती घटनाबाह्य आहे, अशी  टीकाही त्यांनी केली.

अ‍ॅड. नाईक म्हणाले, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मुंबई येथे उपचारासाठी जात असल्याने मंत्री फ्रान्सिस डिसोझा, सुदिन ढवळीकर व विजय सरदेसाई  या तीन मंत्र्यांची समिती स्थापन करून त्यांना 5 कोटी रुपयांपर्यंतची कामे मंजूर करण्याचे अधिकार बहाल केले आहेत. प्रत्यक्षात अशा प्रकारची समिती स्थापन करण्याची घटनेत कुठलीही तरतूद नाही. तीन मंत्र्यांची समिती म्हणजे राज्याला  आता  तीन मुख्यमंत्री असतील का? या समितीकडे फाईली मंजुरीसाठी कशा प्रकारे जातील?, सदर समिती कुठल्या निकषांवर 5 कोटी रुपयांपर्यंतची कामे मंजूर करेल,  याचा तपशील देण्यात आलेला नाही.  त्यामुळे ही तीन मंत्र्यांची समिती म्हणजे एक घोटाळाच आहे. 

राज्यातील प्रशासकीय निर्णय मुख्यमंत्री पर्रीकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे घेतील, असे सांगितले जाते. प्रशासकीय कामांसंदर्भातील फाईल मुख्यमंत्री पर्रीकर कशा सही करतील. कुठल्या आधारे प्रशासकीय निर्णय घेतले  जातील हेदेखील स्पष्ट करण्यात आलेले नाही.  राज्य प्रशासन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे चालवण्याचा प्रकारही घटनेत नाही, असेही नाईक म्हणाले.

भाजपप्रणित सरकारने समान किमान कार्यक्रमाव्दारे विविध आश्‍वासने दिली होती. यापैकी माडाला  राज्य वृक्षाचा दर्जा देण्याचे आश्‍वासन  वगळता एकाही आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही. सध्याची राज्य प्रशासनातील स्थिती पाहता किमान समान कार्यक्रमाचे पुढे काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे, असेही ते म्हणाले.