Thu, Feb 21, 2019 15:17होमपेज › Goa › ऑडिशनच्या नावाखाली नवकलाकारांची फसवणूक

ऑडिशनच्या नावाखाली नवकलाकारांची फसवणूक

Published On: Feb 05 2018 1:41AM | Last Updated: Feb 05 2018 12:14AMमडगाव : प्रतिनिधी

सिनेसृष्टीत येण्यासाठी अनेक नवकलाकारांची धडपड सुरू असते. याच संधीचा लाभ घेत ऑडिशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात नव कलाकारांची फसवणूक सुरू आहे. चित्रपट महामंडळाचा दाखला असल्याशिवाय ऑडिशन घेता येत नाही याची माहिती चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी धडपडणार्‍या युवक-युवतींनी ठेवावी, असे आवाहन अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले.

केपे सरकारी महाविद्यालयात आयोजित महामराठी संमेलनात डॉ.अजय वैद्य यांनी  उसगावकर यांची मुलाखत घेतली. उसगावकर म्हणाल्या, की घरात अभिनयाला पोषक वातावरण नव्हते. वडील अभिनयाच्या  विरोधात होते. आजोबा राघवेंद्र खांडेपारकर यांचे चित्रपट सृष्टीत नायक व्हायचे स्वप्न होते. 

त्यासाठी वयाच्या पंधराव्या वर्षी ते मुबंईत प्रभात स्टुडिओत पळून गेले  आणि व्ही. शांताराम यांना भेटले. परंतु व्ही. शांताराम यांनी त्यांना परत जाऊन शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले होते, आजोबांचे  गुण आपल्यात आले आहेत.कलाकेंद्रातून  करिअरला सुरवात केली. दामू केंकरे आणि लक्ष्मणराव देशपांडे हे दोघे आपल्याला गुरुस्थानी आहेत. कार्टी प्रेमात पडली हे नाटक आपल्या कारकिर्दीची सुरवात होती.त्या वेळी मराठवाड्यात बाळासाहेब ठाकरे यांचे घर आपल्या खोलीच्या जवळ होते. त्यामुळे उशिरा जरी घरी परतले तरी सुरक्षिततेची भावना होती.

ब्रम्हचारी या नाटकातून वर्षा उसगावकर हे नाव घरोघरी  पोहचले.या नाटकात हाफ पँट  आणि टी शर्ट असा पेहराव करावा लागला. त्यावेळी स्विमींग सूट घालण्यावरून मोठा गदारोळ माजला होता.अशा काही आठवणी उसगावकर यांनी सांगितल्या. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे आपली कारकीर्द घडली, असेही त्या म्हणाल्या.