Fri, Apr 19, 2019 12:40होमपेज › Goa › खासगी वाहने व्यवसायासाठी वापरणार्‍यांवर होणार कारवाई

खासगी वाहने व्यवसायासाठी वापरणार्‍यांवर होणार कारवाई

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 12:11AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

राज्यातील खासगी वाहनांचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक कारणांसाठी  वापर करणार्‍या चालक, मालकांविरुद्ध वाहतूक संचालनालयाने कडक कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. खासगी वाहनांचा टॅक्सी, मालवाहू वाहन अथवा प्रवासी वाहन म्हणून वापर केल्यास कारवाई करण्यात येणार असून  शुक्रवार दि. 8 डिसेंबर पासून मोहीम राबवण्यात येणार आहे. कारवाईची ही मोहीम 5 जानेवारी 2018 पर्यंत चालणार आहे, असे वाहतूक संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितले.

वाहतूक संचालनालयाने गुरुवारी जारी केलेल्या आदेशात, व्यावसायिक वापराचा परवाना नसलेल्या वाहनांवर सक्‍त कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. या वाहनातील वाहन चालकाकडे जर सार्वजनिक वाहतूक सेवेतील वाहने चालवण्याचा परवाना नसेल, तर त्याच्यावरही दंडात्मक कारवाई होईल. राज्यात अनेक वाहनचालकांकडे  परराज्यातील वाहन परवाने असले तरी ते गोव्यात बेकायदेशीररित्या टॅक्सी व्यवसाय चालवत असल्याचे आढळून आले आहे. अनेक खासगी मालकीची वाहने पर्यटकांना भाड्याने दिली जात असून भरमसाठ नफा कमावला जात असल्याचेही दिसून आले  आहे. या बेकायदेशीर प्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अनधिकृत ड्रायव्हिंग स्कूलवर कारवाई

राज्यात बेकायदेशीरपणे ‘ड्रायव्हिंग स्कूल’  चालवणार्‍यांविरुद्ध आणि दलालांवर वाहतूक खात्यातर्फे कडक कारवाई केली जाणार आहे, असे वाहतूक संचालक निखिल देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यात ‘अ‍ॅटोमॅटिक ट्रक ड्रायव्हिंग अँड लायसेन्सिंग’ यंत्रणा बसवली जाणार आहे. यामुळे कायदेशीर ज्ञान आणि शिस्तबद्दरित्या वाहन चालवता येणार आहे, त्यांनाच वाहन परवाना दिला जाणार आहे. या यंत्रणेमुळे नवशिक्या वाहनचालकांपैकी केवळ 40 टक्के अर्जदारांनाच परवाना मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.