होमपेज › Goa › हिंसक आंदोलकांवर कारवाई करणार

हिंसक आंदोलकांवर कारवाई करणार

Published On: Mar 22 2018 1:42AM | Last Updated: Mar 22 2018 1:42AMपणजी : प्रतिनिधी

खाण अवलंबितांनी सोमवारी पणजीत झालेल्या आंदोलनात यावेळी रास्ता रोको, दगडफेक आणि मारहाणीसारखी हिंसक कृत्ये केलेल्या आंदोलकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांंनी बुधवारी त्रिमंत्री सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

खाण अवलंबितांनी सोमवारी केलेल्या आंदोलनात टॅक्सी युनियनच्या नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केल्याने वातावरण तंग झाले. कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी आंदोलनात सहभागी होणे बेकायदेशीर असून याप्रकरणी कारवाई करण्याचा निर्णय त्रिमंत्री समितीच्या बैठकीत झाल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.

त्रिमंत्री समितीची बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. खाण अवलंबितांच्या पणजीतील सोमवारच्या हिसंक आंदोलनबाबत चर्चा  झाली. योग्य नेतृत्वाच्या अभावामुळे हे आंदोलन चिघळले व परिस्थिती हाताबाहेर गेली, असे सांगून ढवळीकर म्हणाले, की या आंदोलनाच्या दिवशीआपण 12.45 वाजता आंदोलकांना समजवण्यासाठी क्रांती सर्कलजवळ आलो. अांदोलकांना आझाद मैदानावर अथवा पाटो येथील सेंट्रल लायब्ररीजवळील मोकळ्या जागेत सभा घेण्याचे आवाहन केले. त्याचवेळी  दुपारी 1 वा. टॅक्सी युनियनचे एका नेत्याने उपस्थितांना संबोधून प्रक्षोभक भाषण केले. त्यामुळे शांततेने चाललेल्या आंदोलनात अचानक दगडफेक सुरू झाली. अखेर पोलिसांना बचावासाठी प्रत्युत्तर द्यावे लागले. यामुळे आंदोलकाची धावाधाव सुरू  झाली. या गोंधळात सामान्य लोक आणि आंदोलकांपेक्षा पोलिस अधिक जखमी झाले. सरकारच्या मालकीच्या अनेक वाहनांची तोडफोडीत नुकसान झाले. पोलिसांनी काही आंदोलकांविरूद्ध गुन्हाही नोंद केला असून काहींना अटकही केली. या संशयितांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आले असून त्यांच्याविरूद्ध कारवाई निश्‍चितच केली जाणार आहे. 

कृषीमंत्री विजय सरदेसाई म्हणाले, की लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन-मोर्चाचा आम्ही आदर करत असल्याने पणजीतील मोर्चाला परवानगी दिली होती. सामान्य नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून आंदोलन कांपाल मैदानावर घेण्याचे आवाहनही केले होते. खाणबंदीच्या प्रश्‍नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे आंदोलकांना सांगितले होते. तरीही हिंसक आंदोलन करून खाण अवलंबितांनी जनतेची सहानभुतीही गमावली आहे. या आंदोलनात लाठीमार झाल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणारे काँग्रेस नेते त्यावेळी कुठे होते, काँग्रेसचे सरकार असताना केलेल्या खाण घोटाळ्यामुळे आजची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे, याची त्यांना जाणीव आहे का, तसेच सामान्य लोकांना वेठीस धरल्याबद्दल काँग्रेसने  दुख: व्यक्‍त केले आहे का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.