Tue, Apr 23, 2019 18:25



होमपेज › Goa › राज्यातील मासळी माफियांवर कारवाई करावी

राज्यातील मासळी माफियांवर कारवाई करावी

Published On: Jul 23 2018 1:07AM | Last Updated: Jul 22 2018 11:35PM



पणजी : प्रतिनिधी

‘माशांमध्ये फार्मेलिन’ प्रकरणी राज्य सरकार गोवा फॉरवर्डचे नेते तथा कृषीमंत्री विजय सरदेसाई यांच्या दबावाखाली वावरत आहे. राज्यातील मासळी मार्केटात वावरत असलेल्या माफियांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 

येथील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर म्हणाले, की  आसाम सारखे राज्य फार्मेलिनयुक्त मासळीच्या आयातीवर तात्काळ  बंदी घालते. मात्र, मुख्यमंत्री पर्रीकर यांना या विषयावर विधान करण्यासाठी बारा दिवस का लागले, असा प्रश्‍न लोक विचारत आहेत. गोवेकरांसाठी मासळी आयात करण्याची गरज नाही. राज्यात गोमंतकीयांना पुरेशा प्रमाणावर माशांचे उत्पन्न होत असून परराज्यातून माशांची आयात करण्याची गरजच नाही. गोवेकरांना पुरून उरलेली मासळी असल्यास ती निर्यात करण्यास हरकत नाही. राज्यात मासळी आयात करणारे माफिया पर्रीकर यांनी नष्ट करण्याची गरज आहे. जर पर्रीकर यांनी आपण या प्रश्‍नात लक्ष घालणार असल्याचे जाहीर केले असेल तर एका दिवसात दोन अहवाल कसे तयार होतात, याचे उत्तर द्यावे. एफडीएच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांना कोणत्या राजकारण्यांनी संपर्क साधला याची माहिती त्यांच्या फोनवरील तपशील तपासल्यास लोकांना समजेल, असेही चोडणकर म्हणाले.

चोडणकर म्हणाले, जनादेश नसताना 2017 साली बळजबरीने भाजप आघाडी सरकार स्थापन करण्यात आले होते. या सरकारात सरदेसाई यांना सामील करून पर्रीकर यांनी मोठी चूक केली आहे. ‘भाजपबरोबर सरकार स्थापन करणार्‍यांना लोकांचा शाप बाधणार’ असे विधानसभा निवडणुकीआधी म्हणणारे सरदेसाई स्वत:च भाजप आघाडी सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे आता त्यांनाच लोकांचा शाप  लागणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीनंतर सरदेसाई यांच्याबरोबर काँग्रेसने युती केली नाही, ही चांगली गोष्ट ठरली आहे. त्यावेळच्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे काँग्रेसने सरदेसाई यांच्याशी हातमिळवणी केली नाही, हे पक्षाच्या दृष्टीने उत्तमच झाल्याचे आता सिद्ध होत आहे. 

मार्केट हलवल्याने माफिया नष्ट होणार का : चोणडकर

शेजारील कारवार वा कुमठा शहरात मासळीची गोव्यापेक्षा निम्म्या दराने विक्री  होत असून गोवेकर आज घातक मासळी चढ्या दराने विकत घेऊन खात आहेत.  फातोर्डाचे घाऊक मासळी मार्केट स्थलांतरीत  करण्याची मागणी करणारे सरदेसाई कोण आहेत, ते मच्छीमार मंत्री की आरोग्यमंत्री आहेत, याचा खुलासा त्यांनी करावा. मार्केट स्थलांतरीत केले म्हणून मासळी व्यवसायातील माफिया नष्ट होणार का, असा सवालही चोडणकर यांनी केला.