Tue, Jul 16, 2019 00:24होमपेज › Goa › महाराजा कॅसिनोच्या अतिक्रमणावर कारवाई

महाराजा कॅसिनोच्या अतिक्रमणावर कारवाई

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 23 2018 12:01AMपणजी : प्रतिनिधी  

पणजी येथील कॅप्टन ऑफ पोर्ट जेटीच्या पदपथावरील महाराजा कॅसिनोकडून उभारण्यात आलेले अतिक्रमण हटवण्यास अखेर शुक्रवारी सुरवात झाली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली. या अतिक्रमणाविरोधात गेल्या काही दिवसांपासून लोकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. यात   काँग्रेस, आम आदमी पक्ष या राजकीय पक्षांनीही उडी घेऊन आंदोलन केले होते.महाराजा कॅसिनोकडून पदपथावर  उभारण्यात आलेल्या अतिक्रमणाची गंभीर दखल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतली. त्यानुसार  पर्रीकर यांनी   48 तासांत कॅप्टन ऑफ पोर्टला हे अतिक्रमण हटवले जाईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

महाराजा कॅसिनोकडून पदपथावर अतिक्रमण करण्यात आले होते. अतिक्रमणामुळे पादचार्‍यांना पदपथावरून जाण्यासही वाव मिळत नसल्याने वाहनांच्या रहदारीतून वाट काढत पादचार्‍यांना रस्त्यावरून जाणे भाग पडत होते.  या अतिक्रमणाविरोधात पणजी महानगरपालिकेचे आयुक्‍त काहीच कारवाई करीत नाहीत.  सदर अतिक्रमण म्हणजे  महाराजा कॅसिनोकडून  उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचे नमूद करून आम आदमी पक्षाने न्यायालयात महाराजा कॅसिनोविरोधात अवमान याचिका दाखल केली  आहे.  या कॅसिनोकडून उभारण्यात आलेले हे अतिक्रमण  काल, शुक्रवारी कॅप्टन ऑफ पोर्ट तसेच पणजी महानगरपालिकेच्या निरीक्षकांच्या उपस्थितीन हटवण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे पदपथ  पादचार्‍यांसाठी मोकळा झाला आहे.