Wed, May 22, 2019 20:42होमपेज › Goa › गोव्यात बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई

गोव्यात बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 20 2018 12:39AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यास वाहतूक खात्याने सुरवात केली आहे. 50 खासगी वाहने जप्‍त करून त्यापैकी  6 चारचाकी  व 15 दुचाकींचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत, अशी माहिती वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी दिली.

देसाई म्हणाले, की खासगी वाहने पर्यटकांना बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करण्यासाठी दिली जात असल्याचे आढळून आले आहे. खात्याने  वरील कारवाई करून, अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. खासगी वाहनांचा प्रवासी वाहतुकीसाठी होणार्‍या वाहनांचे परवाने मोटर वाहन कायद्याचे कलम 53 अंतर्गत   निलंबित करण्याची प्रक्रिया वाहतूक खात्याने सुरू केली आहे. निलंबन काळात वाहने चालवण्यास सक्‍त मनाई असते. निलंबन काळात जर  वाहनांतून वाहतूक होत असल्याचे  दिसून आल्यास कडक कारवाई केली  जाते.

देसाई म्हणाले, की म्हापसाचे सहाय्यक  वाहतूक संचालक  आयव्हो रॉड्रिगीस यांनी 6 चारचाकी  व  15 दुचाकींचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. यापुढे ही  कारवाई सुरुच राहणार आहे. विकेंड काळात  जेव्हा पर्यटक मोठया संख्येने  येतात, तेव्हा खासगी  वाहने पर्यटकांना   प्रवासी वाहतुकीसाठी देण्याच्या प्रकारात वाढ  होत असते.

‘रेन्ट अ कॅब’अंतर्गत नोंदणीसाठी धाव

बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवरील कारवाईमुळे  या व्यवसायात गुंतलेल्या अनेक  व्यावसायिकांनी  आपल्या वाहनांची रेंट अ कॅब अंतर्गत नोंदणी व्हावी, यासाठी   वाहतूक खात्याशी संपर्क  साधण्यास सुरुवात केल्याची माहिती वाहतूक खात्याच्या सूत्रांनी दिली.