Tue, Apr 23, 2019 22:13होमपेज › Goa › मिकी पाशेको विरोधात आरोप निश्‍चितीचे आदेश

मिकी पाशेको विरोधात आरोप निश्‍चितीचे आदेश

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 12:25AMमडगाव ः प्रतिनिधी

माजोर्डा येथील ट्रेजर कॅसिनोत व्यवस्थापक जेराल्ड फेर्नांडिस यांना माजी आमदार मिकी पाशेको आणि मॅथ्यू दिनीज यांनी धक्काबुक्की करून धमकी दिल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अश्‍विनी कांदोळकर यांनी आरोप निश्‍चितीचा आदेश दिला असून पुढील सुनावणी 17 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

भा.दं.सं. कलम 341, 352, 506 (2) अन्वये आरोप निश्‍चित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. शासनातर्फे सहायक सरकारी वकील कॉलमन रॉड्रीग्स बाजू मांडत आहेत तर संशयितातर्फे वकील विवेक नाईक बाजू मांडत आहेत. कॅसिनोचे व्यवस्थापक जेराल्ड यांनी 30 व 31 मे 2009 च्या रात्री घडलेल्या घटनेनुसार दाखल केलेल्या आरोपपत्रातून न्यायदंडाधिकारी कल्पना गावस यांनी संशयितांना यापूर्वी निर्दोषमुक्त केले होते.

या पार्श्‍वभूमीवर मिकी पाशेको यांच्या वकिलाने युक्तिवादावेळी जेराल्ड आणि अशोककुमार राव यांनी दाखल केलेले प्रकरण समान असल्याचा दावा केला असता, दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असून वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या ठिकाणी घडलेली प्रकरणे असल्याचे सरकारी वकिलाने स्पष्ट केले.
क्राईम ब्रँचने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार 29 मे 2009 रोजी मिकी पाशेको आणि मॅथ्यू दिनीज हे दोघे माजोर्डा येथील ट्रेजर कॅसिनोत गेले होते. कॅसिनोमध्ये बेटिंग लावताना काही वाद झाला असता दोघांनी जेराल्ड यांना धक्काबुक्की करून धमकी दिल्याची तक्रार कॅसिनोचे मुख्य व्यवस्थापक अशोककुमार राव यांनी पोलिस स्थानकात नोंदवली होती. दरम्यान, संशयित मॅथ्यू दिनीज मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी हजर होते, तर मिकी पाशेको गैरहजर होते.