Thu, Jun 20, 2019 01:19होमपेज › Goa › फार्मेलिनबाबत मासळीची यापुढे अचानक तपासणी : आरोग्यमंत्री

फार्मेलिनबाबत मासळीची यापुढे अचानक तपासणी : आरोग्यमंत्री

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 11 2018 12:21AMपणजी : प्रतिनिधी

परराज्यातून आयात करण्यात येत असलेल्या मासळीत फार्मेलिन हे घातक रसायन आढळल्यानंतर सुरू केलेली मासळीची नियमित तपासणी  अन्‍न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) बंद केली असून सदर चाचणी आता अचानकपणे आणि पूर्वकल्पना न देता फक्‍त सीमेवरच नव्हे तर बाजारपेठेत तसेच रेस्टॉरंटमध्येही केली जाणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले. 

कला अकादमी येथे एका शासकीय कार्यक्रमानंतर पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना राणे म्हणाले की, एफडीएकडे अपुरा कर्मचारी वर्ग असूनही आयात मासळीत फार्मेलिनचा अंश आहे की नाही, हे तपासण्यासाठी 4 ऑगस्टपासून खात्यातर्फे विशेष मोहीम राबवण्यात आली होती. पोळे आणि पत्रादेवी चेकनाक्यावर सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आजपर्यंत एकदाही मासळीत फार्मेलिन आढळले नाही. मात्र, मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अधिकार्‍यांना सीमेवर दक्ष रहावे लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्‍त ताण पडत आहे. या कामामुळे प्रशासनाच्या अन्य कामावरही परिणाम होत आहे. नियमित होणार्‍या चाचणीचा खर्चही भरमसाठ होत आहे. यामुळे सदर नियमित चाचणी आता बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी, आता राज्यात आयात होणार्‍या मासळीची कधीतरी आणि अचानकपणे तपासणी केली जाणार आहे. 

मासळीवरील चाचणी ‘एफएसएसआय’च्या निर्देशानुसार केली जात असून कोणालाही त्याबाबत शंका येत असल्यास आपण अडवू शकत नाही. मात्र, या चाचण्या अत्यंत काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे केल्या गेल्याचे राणे यांनी सांगितले. 

गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर एफडीएकडून राज्यातील स्वीट मार्ट आणि अन्य ठिकाणी विक्री होत असलेल्या मिठाईची तपासणी करण्याचा आदेश दिला असल्याचे राणे यांनी नमूद केले.