Thu, Dec 13, 2018 23:34होमपेज › Goa › कॅसिनोसाठी खास ‘एंटरटेन्मेंट झोन’मध्ये जागा

कॅसिनोसाठी खास ‘एंटरटेन्मेंट झोन’मध्ये जागा

Published On: Feb 22 2018 1:39AM | Last Updated: Feb 22 2018 1:39AMपणजी : प्रतिनिधी

मोपा येथील नियोजित ग्रीनफिल्ड विमानतळाजवळ विशेष ‘एंटरटेन्मेंट झोन’ निर्माण करून त्या जागी राज्यातील ऑफशोअर कॅसिनो स्थलांतरित करण्याचा सरकारचा विचार आहे. स्थलांतराचा विषय सोपा नसल्याने कॅसिनो धोरण तयार करून या विषयावर तोडगा काढला जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. 

राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या अभिभाषणावरील अभिनंदन ठरावाच्यावेळी   विरोधी आमदारानी केलेल्या टीकेला उत्तर देताना ढवळीकर यांनी ही माहिती सभागृहात बुधवारी दिली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गैरहजेरीत त्यांच्यावतीने उत्तर देताना ढवळीकर म्हणाले, की राज्य सरकारच्या   दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली सरकार  100 कोटीच्यावर दर वर्षाला खर्च करीत आहे. ‘लाडली लक्ष्मी’सारखी योजना आज  राज्यातील सर्व गरीब, मध्यमवर्गीय तथा श्रीमंताच्या घरी पोहोचली आहे. राज्य सरकारला  आज कितीही आर्थिक अडचण जाणवत असल्या तरी या सर्व योजना सुरूच राहणार असून त्या बंद केल्या जाणार नाहीत. 

केंद्र सरकारकडून गोव्याला मोठे आर्थिक पाठबळ मिळत असून ‘सागरमाला’ व ‘भारतमाला’ योजनेमुळे अनुक्रमे 6 हजार  कोटी व 100 कोटी रुपयांचा निधी राज्याला मिळाला आहे. या योजनांमुळे राज्यातील मोडकळीस आलेल्या जेटी विकसित करण्यासाठी  साळ नदी स्वच्छ करण्यात येणार आहे. गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण तथा दुरुस्ती करण्यासाठी  केंद्राकडून निधी पुरवला जात आहे. त्यामुळे महामार्गाच्या शेजारील   जमिन संपादीत करण्यासाठी व विस्थापितांना घरे बांधण्यासंबंधी समस्या सोडविणे शक्य झाले आहे. साधनसुविधेचा विकास करण्यासाठी केंद्राकडून राज्याला सुमारे 3500 कोटीॅची आर्थिक मदत मिळाली आहे. या निधीमुळे  खांडेपार पुलासाठी 290 कोटी रू., ढवळी बगलमार्गासाठी 100 कोटी रू., वेर्णा बगलमार्गासाठी 280 कोटी रू.आदी महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत.  

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत खूप सुधारणा झाली असून गुन्हेगारीचे प्रमाणही कमी झाले आहे. गुन्ह्यांच्या  तपासकामाचे प्रमाण  83 टक्केपर्यंत सुधारले आहे. कृषी क्षेत्रात शेतकर्‍यांना 75 टक्केपर्यंत अनुदान  दिले जात असून   एससी व  एसटी वर्गाला 90 टक्केपर्यंत अनुदान दिल्याचेही ढवळीकर यांनी सांगितले. 

राज्यातील प्रमुख शहरांना 24 तास पाणी पुरवठा  करण्यात सरकारला अजूनही यश आलेले नसले तरी त्या दिशेन काम सुरू आहे. स्वच्छता अभियानात राज्यात येत्या वर्षभरात  70 हजार शौचालय बांधण्यात येणार  आहेत.  केंद्राच्या मदतीने राज्यातील बसेससाठी खास ‘बस पोर्ट ’ तयार केला जाणार असल्याचे  ढवळीकर यांनी सांगितले.