Sat, Apr 20, 2019 07:51होमपेज › Goa › मांडवीवरील तिसर्‍या पुलाच्या खांबावर आग; चारजण बचावले  

मांडवीवरील तिसर्‍या पुलाच्या खांबावर आग; चारजण बचावले  

Published On: Dec 30 2017 12:47AM | Last Updated: Dec 30 2017 12:35AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

मांडवीवरील तिसर्‍या निर्माणाधीन पुलाच्या खांबाला पॉवर केबलच्या शॉर्टसर्किटमुळे  शुक्रवारी (दि. 29) दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी सदर खांबावर चार कामगार होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवल्यानंतर हे कामगार खांबावरून  सुखरूपपणे खाली उतरले. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. 

गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने  (जीएसआयडीसी)  मांडवीवरील या तिसर्‍या पुलाच्या कंत्राटदाराला या  घटनेसंदर्भात अहवाल  सादर करण्यास सांगितले आहे.  त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिल्याचे  जीएसआयडीसीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सांगितले.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार,  मांडवीवरील तिसर्‍या निर्माणाधीन पुलाच्या खांबावर काम सुरू असताना दुपारी आगीची घटना घडली. या खांबावर  पॉवर केबलचे काम सुरू असताना अचानक शॉर्टसर्कीट  होऊन   आग लागली. सदर घटनेवेळी या खांबावर चार कामगार होते. अग्नीशमन दलाला 2.30 वाजण्याच्या सुमारास आगीच्या दुर्घटनेची माहिती देण्यात आली.  त्यानुसार दुसर्‍या मांडवी पुलावर   दलाच्या जवानांनी   बंब  उभा करून   पाण्याचे फवारे मारून  ही आग विझवली.

मागील वर्षभरात मांडवीवरील  या तिसर्‍या पुलावर घडलेली ही तिसरी दुर्घटना आहे. यापूर्वी 26 डिसेंबर 2016 रोजी पुलाचे काम करताना एक कामगार वेल्डींग करताना अपघात होऊन  ठार झाला होता. तर ऑक्टोबर  2017  मध्ये 80 टन क्रेनचा भाग   काम सुरु असताना नदी पात्रात कोसळला होता.