Sun, Apr 21, 2019 03:50होमपेज › Goa › समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी

समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी

Published On: Jan 01 2018 1:54AM | Last Updated: Dec 31 2017 11:26PM

बुकमार्क करा
मडगाव ः प्रतिनिधी

नववर्षाच्या स्वागतासाठी दक्षिण गोव्यातील कोलवा, बाणावली, माजोर्डा किनारपट्टीवर हजारो पर्यटकांनी रविवारी गर्दी केली. कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी समुद्रकिनारपट्टी व मडगाव शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. किरकोळ अपघात वगळल्यास संपूर्ण सासष्टी तालुक्यात नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. 

देशी-विदेशी पर्यटकांनी समुद्र किनार्‍यावरील हॉटेल्सचे 2-3 महिने अगोदर ऑनलाईन बुकिंग करून ठेवल्यामुळे सर्व हॉटेल्स आरक्षित होते. किनारी भागांत ठिकठिकाणी फूड स्टॉल्स ठेवले होते. थंडीमुळे ऊब घेण्यासाठी किनारी भागांत शेकोट्याही व्यावसायिकांनी ठेवल्या होत्या. शॅकमध्ये जेवणाला आलेल्या लोकांनी या शेकोट्यांची ऊब घेतली. नाताळापूर्वीच सजलेले शॅक, रेस्टॉरंट शेकडो पर्यटकांनी भरले होते. शहरात इतर ठिकाणी पर्यटकांसाठी मोठमोठे गोठे, न्यू इयर पार्टी, चर्चमधील कार्यक्रम, आतषबाजी असे अनेक खास आकर्षण करण्यात आले होते.  

शहरात किनारी भागांत, खुल्या मैदानात व रेस्टॉरंटमध्ये अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या पार्ट्या आयोजित करण्यात आल्या होत्या. या पार्ट्यांसाठी पास व प्रवेश शुल्क ठेेवण्यात आले होते. मडगावात काही क्लबमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डीजे होस्ट व सिंगर्सचा समावेश होता. सासष्टी तालुक्यात कोलवा हाऊसफुल्ल झाला असून, माजोर्डा, बाणावली, केळशी यांसारख्या किनारी भागांत पर्यटकांची मोठी गर्दी होती. किनारी भागांसह हॉली स्पिरीट चर्च, पांडव कॉपेल, ग्रेस चर्च, नावेली चर्च या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली होती.