Sun, May 19, 2019 22:48होमपेज › Goa › ‘संजीवनी’ला गळीत हंगामात 9 कोटींचे नुकसान

‘संजीवनी’ला गळीत हंगामात 9 कोटींचे नुकसान

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 10:35PMफोंडा : प्रतिनिधी

दयानंद-नगर, धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याला 2017-18 सालीच्या गळीत हंगामात अंदाजे 9 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. यात पूर्वीच्या प्रशासकाने कुणालाच विश्वासात न घेता ऊस तोडणीसाठी कंत्राटदाराला दिलेली आगाऊ  5 कोटी 10 लाख रुपयांचा समावेश आहे. संजीवनीला 2016-17 साली 3 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते. जानेवारी महिन्यापासून गोव्याच्या शेतकर्‍यांना उसाची रक्कम मिळली नसल्याने कारखान्याच्या गेटसमोर आंदोलन करण्याचा निर्णय येत्या दोन-तीन दिवसात शेतकरी घेण्याची शक्यता आहे.   

 यावर्षी संजीवनी साखर कारखान्यात एकूण 73659 टन उसाचे गळीत करून 58254 साखरेची पोती तयार झाली. यंदा कर्नाटकातून फक्त  26,499 टन ऊस आणण्यात आला. सुरुवातीला संजीवनी साखर कारखान्याची दुरुस्ती होण्यापूर्वीच कारखाना सुरू केल्याने अनेक वेळा कारखाना बंद पडला होता. यावर्षी जळावू लाकडासाठी संजीवनीला 49,60,000 रुपये खर्च करावे लागलेत. गेल्या वर्षी जळावू लाकडसाठी 23,15,824 रुपये खर्च झाले होते. प्रथमच संजीवनी साखर कारखान्यावर जळावू लाकडासाठी दुपटीने पैसे खर्च करण्याची पाळी आली. त्यात गोव्यातील ऊस उत्पादकांना अंदाजे 4 कोटी तर कर्नाटकातील ऊस उत्पादकांना अजून 4.35 कोटी रुपये संजीवनीने देणे बाकी आहे. तसेच वाहतुकीसाठीचे 1.10 कोटी रुपये संजीवनीने देणे बाकी आहे.

गोव्यातील शेतकर्‍यांनी दि.15 एप्रिल पर्यंत मुदत सरकारला यापूर्वीच दिली असून त्यानंतर आंदोलन करण्याच्या विचारात शेतकरी आहेत. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकर्‍यांना पुढील आठवड्यात रक्कम मिळण्याची शक्यता आहे. गोवा ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी कुणालाच विश्वासात न घेता मागील प्रशासकाने ऊस तोडणीसाठी कंत्राटदाराला आगाऊ 5.10 लाख रुपये दिल्याने यावर्षी संजीवनीच्या नुकसानीत वाढ झाल्याचे सांगितले. कंत्राटदाराला आगाऊ दिलेली रक्कम वसूल करणे आवश्यक आहे. तसेच गोव्यातील शेतकर्‍यांना जर वेळेवर रक्कम न मिळाल्यास पुढील वर्षी ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 

गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी कारखान्याची ट्रायल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे हंगाम सुरू झाल्यानंतर वारंवार कारखाना बंद पडल्याने जळावू लाकडासाठी खर्च दुपटीने वाढला. मागील प्रशासकाने केलेल्या करारानुसार कर्नाटकातून एक लाख टन ऊस आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, कंत्राटदार गायब झाल्याने प्रशासक पदाचा ताबा घेतलेले फोंड्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोदर मोरजकर यांनी स्वतः लक्ष घालून कर्नाटकातून  26,499 टन उसाचे गळीत करण्यात यश मिळविले. गोव्यातील शेतकर्‍यांना अजून उसाची रक्कम मिळाली नसल्याने प्रशासक दामोदर मोरजकर यांनी त्यांना रक्कम मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न सुरु केले आहेत. याची दाखल घेऊनच शेतकर्‍यांनी आपले आंदोलन स्थगित ठेवले. मात्र येत्या काही दिवसात रक्कम न मिळाल्यास शेतकरी कारखान्याच्या गेट समोरआंदोलन सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

प्रशासक दामोदर मोरजकर यांनी थकीत असलेली रक्कम पुढील आठवड्यात गोवा तसेच  कर्नाटकातील शेतकर्‍यांना देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कारखाना वारंवार बंद पडल्याने यावर्षी जळावू लाकडासाठी अधिक खर्च करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले.   
     
Tags : Goa, 9, crore, loss, Sanjeevani, crushing, season