Sun, Jul 21, 2019 12:02होमपेज › Goa › ९.७ टक्के गोमंतकीय अडकले तंबाखूच्या व्यसनात

९.७ टक्के गोमंतकीय अडकले तंबाखूच्या व्यसनात

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 25 2018 1:13AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत असून ते चिंताजनक आहे. 2009-10 सालच्या अहवालाच्या तुलनेत यंदा राज्यात तंबाखू सेवन 1 टक्क्याने  वाढले असून लोकसंख्येच्या एकूण 9.7 टक्के लोक तंबाखूच्या व्यसनात अडकले असल्याचा अहवाल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्वे-2’ या शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात देशातील तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्यातील 9.7 टक्के लोकांना धुम्रपान वा तंबाखू सेवनाचे व्यसन जडले आहे.

याआधी 2009-10 साली करण्यात आलेल्या सदर सर्वेक्षणात राज्यात 8.8 टक्के लोक तंबाखू सेवनात गुरफटले असल्याचे उघड झाले होते. त्यात यंदा 1 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे ‘राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन’ (नोट) संस्थेच्या गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले. 

डॉ. साळकर म्हणाले की, जगभरात तंबाखू सेवनामुळेच मृत्यू पडणार्‍यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतात तंबाखूमुळे 70 लाख लोक मृत्यूमूखी पडत असल्याचे उघड झाले आहे. राज्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत असून त्यावर राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

दिल्लीस्थित ‘ग्राहकांचा आवाज’ आणि ‘नोट’ संस्था राज्यात तंबाखू विरोधी जागृती कार्यक्रम करत आहेत. ‘ग्राहकांचा आवाज’चे सीईओ अशिम सन्याल म्हणाले की, राज्यातील युवक तसेच बालकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, धुम्रपानाचे प्रमाण वाढले आहे. जगात तंबाखू पदार्थांचे निर्माण करणारा भारत हा तिसरा तर तंबाखू सेवनामध्ये दुसरा सर्वात मोठा देश आहे. भारतातील ग्रामीण भागातील प्रत्येकी तिसरा आणि शहरातील पाचवी व्यक्ती  तंबाखूचे या ना त्या मार्गाने सेवन करत आहे. 

परप्रांतियांमुळे संख्येत वाढ

देशातील 15 वर्षांवरील 28.6 टक्के  व्यक्ती तंबाखू सेवन करत आहेत. यातील सुमारे 24.9 टक्के दररोज तर 3.7 टक्के कधीतरी तंबाखू सेवन करतात. गोव्यात धुम्रपानाचे प्रमाण 0.6 टक्क्यांनी कमी झाले असले तरी अन्य तंंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्‍यांचा आकडा 1.9 टक्क्यांनी वाढला आहे. परराज्यातील कामगार तथा स्थलांतरीत कनिष्ठ वर्गामुळे ही संख्या वाढत  असल्याचे ‘ग्राहकांचा आवाज’चे सीईओ अशिम सन्याल  यांनी सांगितले.