Tue, Jun 25, 2019 15:10होमपेज › Goa › चिंबल, पर्वरी आयटी पार्कमध्ये ९ हजार रोजगार संधी : खंवटे

चिंबल, पर्वरी आयटी पार्कमध्ये ९ हजार रोजगार संधी : खंवटे

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 1:32AM
पणजी : प्रतिनिधी

चिंबल व पर्वरी येथील आयटी पार्क संदर्भातील श्‍वेतपत्रिका जारी करण्यात आली आहे. दोन्ही आयटी पार्कात मिळून 7 ते 9 हजार  रोजगार संधी उपलब्ध होणार असून या नोकर्‍यांमध्ये अनुक्रमे पर्वरी व चिंबलवासीयांना प्राधान्य दिले जाणार आहे. राज्यातील सर्व तालुक्यांत लहान आयटी पार्क उघडले जाणार असून रोजगार निर्मितीवर मुख्यतः भर दिला जाणार आहे, असे माहिती व तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.येथील एका हॉटेलात प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी चिंबल व पर्वरी येथील प्रस्तावित आयटी पार्कसंबंधी सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणानंतर मंत्री खंवटे पत्रकारांशी बोलत होते. 

ते म्हणाले की, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली मागील 20 महिने आम्ही गोवा ‘माहिती व तंत्रज्ञान’ (आयटी) आणि ‘आयटीसंबंधित अन्य सेवेचे’ (आयटीईएस) केंद्र बनावे यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले आहेत. यासाठी प्राथमिक टप्प्यावर चिंबल आणि पर्वरी येथे आयटी पार्क बनवण्याचे सरकारचे ध्येय आहे. पर्वरीत 3 एकर अणि चिंबल येथे सुमारे 12 एकर जमिनीत आयटी पार्क उभारले जाणार आहे. येत्या 2-3 महिन्यांत या दोन्ही प्रकल्पांचे काम सुरू होणार असून सुमारे 14 ते 18 महिन्यांत दोन्ही प्रकल्पांचा पहिला टप्पा बांधून पूर्ण करण्याचा सरकारचा मनोदय आहे. 

राज्यातील सुशिक्षित तरूण रोजगारच्या संधी नसल्यामुळे राज्यापासून आणि आपल्या कुटुंबियांपासून तुटले जाऊन अन्य राज्यांत स्थलांतर करत आहेत. या गोमंतकीय युवकांना पुन्हा राज्यात आणून त्यांना रोजगार देण्यासाठी आयटी पार्क बांधले जाणार आहेत. याआधी आयटी पार्क संबंधीचे सादरीकरण सांताक्रुजचे आमदार टोनी फर्नांडिस, जिल्हा पंचायत तसेच  चिंबल पंचायत सदस्यांना दाखवण्यात आले आहे.  

कदंब पठारावर याआधीही अनेक वसाहती व बांधकाम प्रकल्प उभारण्यात आले असले तरी त्याला कोणीही आजपर्यंत आडकाठी आणली नव्हती. मात्र केवळ बोटावर मोजता येतील, इतक्या कथित पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकार्‍यांमुळे चिंबल आयटी पार्कला विरोध केला जात आहे. चिंबल येथील तळे या प्रस्तावित प्रकल्पापासून 400 मीटर्स लांब असून ते प्रदूषित होऊ दिले जाणार नाही. केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी माजी आमदार व त्यांचा पुत्र लोकांच्या भावना भडकावत असून आपल्याविरूद्धही अनेक खोटेनाटे आरोप केले जात आहेत. आपण राज्यातील कोणत्याही व्यक्ती वा संघटनेला सदर सादरीकरण पाहण्याची संधी देणार असून त्यांनी 17 जानेवारीपर्यंत सरकारकडे तशी मागणी करावी, असे खंवटे यांनी सांगितले. 

देशातील अन्य राज्यांतील आयटी पार्क हे भव्य प्रकल्प असून त्यासाठी 150 ते 200 एकर जमिनीचा वापर केला जातो. मात्र गोवा हे  लहान राज्य असल्याने चिंबलमध्ये संपादित केलेल्या 112 एकर पैकी फक्त 12 एकरमध्ये लहान आयटी पार्क  उभारला जाणार आहे. या पार्कशेजारी आपली अथवा आपल्या  पूर्वजांची कुठलीही जागा नाही. मात्र, प्रकल्पांविरोधात आंदोलन करणार्‍यांनी किती जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्या आहेत, ते आपण  लवकरच उघड  करू, असा इशारा खंवटे यांनी दिला.