Sat, Jul 20, 2019 23:40होमपेज › Goa › गोव्यात बारावीचा निकाल ८५ टक्के

गोव्यात बारावीचा निकाल ८५ टक्के

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 12:05AMपणजी : प्रतिनिधी

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 85.53 टक्के लागला आहे. पर्वरी केंद्राचा सर्वाधिक 96.80 टक्के तर फोंडा केंद्राचा सर्वात कमी 75 टक्के निकाल लागला आहे. गणित विषयात विद्यार्थ्यांची कामगिरी घसरल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालात 3 टक्के घसरण झाली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी पर्वरी येथील मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

राज्यात एकूण 17,739 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 15,172 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 9,394 मुली तर 8,345 मुले परीक्षेला बसली होती. परीक्षेत मुलींनी 88.31 टक्के तर मुलांनी 82.39 टक्क्यांनी बाजी मारली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक 90.58 टक्के लागला आहे. 

कला शाखेचा निकाल 85.17 टक्के, विज्ञान शाखा 82.31 टक्के तर व्यावसायिक शाखेचा निकाल 82.58 टक्के लागला आहे. कला शाखेतील 4,079 विद्यार्थ्यांपैकी 3,474 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतील 5,462 पैकी 4,496 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेतील 5,402 पैकी 4,893 विद्यार्थी तर व्यावसायिक शाखेतील 2,796 पैकी 15,172 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षेत बसलेल्या 3,743 विद्यार्थ्यांना क्रीडा गुण प्राप्त झाले होते. यातील 255 विद्यार्थी क्रीडा गुणांनी  उत्तीर्ण झाले आहेत. क्रीडा गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 1.4 आहे. फेरमूल्यांकनासाठी 7 मे रोजी अंतिम तारीख आहे.

पत्रकार परिषदेत शालांत मंडळाचे सचिव भगिरथ शेटये, उपसचिव भारत चोपडे आणि सहाय्यक सचिव ज्योत्स्ना सरिन उपस्थित होत्या.

15 विद्यालयांचा निकाल 95 टक्के

राज्यातील 15 विद्यालयांचा  निकाल 95 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यात  उत्तर गोव्यातील 9 तर दक्षिण गोव्यातील 6 विद्यालयांचा समावेश आहे. गतवर्षी 23 उच्च माध्यमिक विद्यालयांचा निकाल 95 टक्क्यांपेक्षा अधिक लागला होता. यंदा 95 टक्के निकाल लागलेल्या विद्यालयांमध्ये मोठी घट झालेली आहे. उत्तर गोव्यात 95 टक्के निकाल लागलेल्या विद्यालयांमध्ये विश्‍वनाथ महादेव परुळेकर उच्च माध्यमिक विद्यालय बार्देश, विद्या प्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालय पर्वरी, कमलेश्‍वर शिक्षा प्रसारक संस्था कोरगाव, वसंत व्ही. एस. कुंकळेकर विद्यालय एला गोवा, डॉन बॉस्को पणजी, मुष्टीफंड उच्च माध्यमिक विद्यालय पणजी, आर्यन मुष्टीफंड उच्च माध्यमिक विद्यालय पणजी आणि केशव बळीराम हेडगेवार पणजी या विद्यालयांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात नुवे येथील कार्मेल उच्च माध्यमिक विद्यालय, मडगाव येथील दामोदर उच्च माध्यमिक विद्यालय, वेर्णा येथील फा. आग्नेल मल्टीपर्पज उच्च माध्यमिक विद्यालय, मारीया बंबीना विद्यालय कुंकळी, वास्को येथील सेंट एंड्रयू उच्च माध्यमिक विद्यालय आणि मदर तेरेसा ऑफ जिजस विद्यालय चावडी काणकोण यांचा समावेश आहे.

परीक्षेत मुलींची बाजी 

शालांत मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेत धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी सावी नाटेकरने 94.16 टक्के गुण प्राप्त केले आहेत. धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाची शिवानी भिडे हिने वाणिज्य शाखेत 95.5 टक्के प्राप्त केले आहेत. झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयाची नॅरीझा जुझार्थ हिने कला शाखेत 97 टक्के गुण प्राप्त केले आहेत.