Fri, Apr 26, 2019 09:23होमपेज › Goa › दाम्पत्यावर हल्ला करून ८ लाखांची चोरी

दाम्पत्यावर हल्ला करून ८ लाखांची चोरी

Published On: Jul 02 2018 1:43AM | Last Updated: Jul 02 2018 12:59AMमडगाव ः प्रतिनिधी

गिरदोली येथील महालक्ष्मी मंदिराजवळ रहाणार्‍या ज्योकींम इस्तेबेरो (वय 75) आणि  मारिया इस्तेबेरो (68) या ज्येष्ठ दाम्पत्याला    मारहाण करून सुर्‍याच्या धाकाने कोंडून ठेवून घरातील रोकड आणि दागिने असा आठ लाखांचा ऐवज  पळवल्याच्या खळबळजनक घटनेचा तपास 16 तासांत लावण्यात  पोलिसांना यश आले.

मायणा कुडतरी पोलिस, मडगाव शहर आणि कुडचडे पोलिसांनी संयुक्त कारवाई करून घटनेला 16  तास उलटण्यापूर्वीच मडगावातील अट्टल गुन्हेगार अन्वर सिकंदर शेख आणि त्याचा साथीदार सरफराज आदम यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे गिरदोली भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. मारहाणीत या वृद्ध जोडप्याला बर्‍याच जखमा झाल्या आहेत. त्यांना मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. पोलिसांनी सुरवातीला दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला होता.

या घटनेला 16 तास उलटण्यापूर्वीच मडगाव शहर, मायणा कुडतरी आणि कुडचडे पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत अन्वर सिकंदर शेख (हौसिंग बोर्ड कॉलनी पर्वरी) आणि सरफराज मोहम्मद आदम (झरीवाडो दवर्ली ) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. चोरीसाठी त्यांनी वापरलेली मारुती स्विफ्ट कार (जी ए 03 पी 4725) जप्त केली असून चोरट्यांकडून सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण वस्त आणि उपनिरीक्षक अमीन नाईक यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  ही घटना पहाटे 4  वाजण्याच्या सुमारास घडली. अन्वर आणि सरफराज या अट्टल चोरट्यांनी ईस्तेबेरो जोडपे घरात एकटेच रहात असल्याचा अभ्यास करून रविवारी पहाटे छताची कौले काढून घरात प्रवेश केला. त्यांच्या मदतीला कोणी येणार नाही, याची खात्री करून त्यांनी ईस्तेबेरो पती-पत्नीला मारहाण करून बेडरूममध्ये कोंडले.तसेच पैसे व दागिने घेऊन ते पसार झाले. कोंडून ठेवलेल्या दाम्पत्याने आरडाओरड करून मदत मागण्याचा प्रयत्न केला असता सकाळी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असलेल्या लोकांना त्यांचे रडणे ऐकू आले त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यांची सुटका करण्यात आली. 

पोलिस निरीक्षक प्रवीण वस्त यांनी दिलेल्या माहितीनुसार गिरदोली येथील ज्योकीम आणि त्यांची पत्नी मारिया त्यांच्या मालकीच्या घरात एकटेच राहतात. रविवारी पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास ज्योकीम यांना आपल्या घरात दोन अज्ञात चोर  घुसल्याची जाणीव झाली. चोरट्यांनी दोघांनाही पकडून जबर मारहाण केली आणि सुर्‍याचा धाक दाखवून कपाटाच्या किल्ल्यांची मागणी केली. जिवाच्या भीतीने ज्योकीम यांनी किल्ली दिली. त्यानंतर त्यांनी दोघांचेही तोंड आणि हात बांधून त्यांना बेडरूममध्ये डांबले आणि कपाटातील सोन्याच्या दहा बांगड्या, अंगठ्या, सोन्याची ब्रेसलेट व इतर सोन्याचे दागिने तसेच 50 हजार रुपयांची रोकड, टी.व्ही., ओव्हन आदी मिळून सुमारे 8 लाखांचा ऐवज  लंपास केला. 

चोरट्यांनी जाताना मुख्य दरवाजाचा वापर केला. या मारहाणीत ज्योकीम यांच्या  शरीराला  सुर्‍यामुुळे जखमा झाल्या होत्या. या दोघांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यामुळे कुडचडे पोलिसांची मदत घेण्यात आली.घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अरविंद गावस आणि उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.