Tue, Mar 19, 2019 11:38होमपेज › Goa › 70 कोटींच्या ठेवी; मात्र विकासाला निधीची उणीव

70 कोटींच्या ठेवी; मात्र विकासाला निधीची उणीव

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 11:43PMमडगाव : विशाल नाईक 

पालिकेकडे निधीच नसल्याने मडगाव शहरात विकासकामे राबवण्यात अडथळे येत असल्याची सबब सांगणार्‍या मडगाव पालिकेच्या नावे विविध राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांत कायम ठेवी, चालू खाते, बचत खात्यांवरील व्याज मिळून तब्बल 70 कोटी रुपये जमा असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई यांनी या निधीचा गरजेनुसार वापर केला जात असल्याचे सांगितले. मात्र, हे पैसे विकासकामांसाठी वापरण्याऐवजी कोणालाही त्याचा थांगपत्ता लागू न देता तसाच निधी साठवून ठेवण्यात आल्याबद्दल नगरसेविका डोरिस टेक्सेरा आणि मनोज मसुरकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

विशेष म्हणजे मडगाव नगरपालिकेच्या कोणत्याही नगरसेवकाला या पैशांबद्दल माहिती प्राप्त नाही. दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना सरकारने पालिकेला सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तीन कोटी रुपयांचा निधी दिला होता. हा निधी खर्च न करता तसाच कायम ठेवींच्या स्वरूपात बँकेत साठवून ठेवण्यात आला आहे.

माजी उपनगराध्यक्ष तथा दिगंबर कामत यांच्या गटातील नगरसेविका डोरिस टेक्सेरा यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, एरव्ही प्रत्येक प्रभागात केवळ पन्नास हजार रुपयांची विकासकामे राबविण्यासाठी पालिकेजवळ पैसे नसतात. पण कोट्यवधी रुपयांचा निधी अशा प्रकारे ठेवींमध्ये साठवून ठेवण्यात आलेला आहे. या ठेवींवर मिळणारे व्याज विकासकामांवर खर्च केले जाऊ शकते, पण तेही करण्यास पालिका तयार नाही. आमदार दिगंबर कामत यांच्यामुळे या ठेवींचे गुपित बाहेर पडले, अन्यथा या पैशांविषयी कधीच कोणाला समजले नसते, असेही डोरिस टेक्सेरा म्हणाल्या.

पालिका क्षेत्रात विकासकामे राबविण्याचा विषय असो किंवा सोनसड्यावर कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा प्रश्‍न असो प्रत्येक बाबतीत पैशांसाठी सरकार पुढे हात पसरणार्‍या मडगाव नगरपालिकेला अजून निवृत्त कर्मचार्‍यांचे थकलेले निवृत्ती वेतन व इतर भत्तेही देता आलेले नाहीत. सरकारच्या भरवशावर बहुमजली पार्किंग प्रकल्प उभारू पाहणार्‍या ‘अ’ दर्जाच्या मडगाव  पालिकेची आर्थिक स्थिती बिकट  आहे, असे भासवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र विविध बँकातील ठेवींमुळे मडगाव  पालिका मालामाल असल्याचे समोर आले आहे.  

एकूण 23 बँकांमध्ये 41 कोटी रुपयांच्या ठेवी आणि त्यावर 2015 सालापासूनचे सात कोटी रुपयांचे व्याज तर इतर 15 बँकांमध्ये बचत खाते, चालू खाते, भविष्य निर्वाह निधी खाते आणि सरकारकडून मिळालेल्या निधीचे सुमारे 22 कोटी जमा आहेत.

सुवर्ण महोत्सवी वर्षातील तीन कोटींच्या निधीशिवाय सोनसड्यावर कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्याकरिता फोमेंतोला देण्यासाठी सरकारने सात कोटी रुपयांचा निधी दिला होता.त्यातील काही रक्कम पालिकेने एक हप्‍ता म्हणून फोमेंतोला दिली होती.उर्वरित पैसे कायमस्वरूपी ठेवी म्हणून साठवून ठेवण्यात आलेले  आहेत.

कायम ठेवींमध्ये सर्वात मोठी ठेव स्टेट बँक शाखेमध्ये आहे. ज्यात साडेचार कोटी रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात आली आहे. या कायम  ठेवींवरून 2015 ते आतापर्यंत 47 लाखांहून अधिक रकमेचे व्याज पालिकेला मिळालेले आहे. बँक ऑफ इंडियाच्या मडगाव शाखेत एक कोटी नव्वद लाख रुपये कायम ठेव स्वरूपात ठेवण्यात आले आहेत.गेल्या तीन वर्षात त्यावर सुमारे साडे बत्तीस लाख रुपये व्याज मिळालेले आहे. पंजाब नॅशनल बँक शाखेमधील ठेवी काढण्यात आलेल्या आहेत, पण त्यावरील सुमारे 20 लाख रुपयांचे व्याज तसेच आहे. रत्नाकर बँकेमध्ये पालिकेच्या एक कोटीच्या ठेवी आहेत, त्यावर व्याजाच्या रुपात 22 लाख रुपये पालिकेला फायदा झालेला आहे. युनियन बँकमधील ठेवीची रक्कम साडेतीन कोटींपेक्षा जास्त असून व्याज खात्यात त्याचे 57 लाख जमा आहेत.केथॉलिक सीरियन बँकच्या मडगाव शाखेमध्ये 77 लाख, कॉर्पोरेशन बँकमध्ये सुमारे 81 लाख, बँक ऑफ महाराष्ट्रच्या मडगाव शाखेत 93 लाख रुपयांच्या ठेवी जमा आहेत.

साऊथ इंडियन बँकेमध्ये पालिकेने सुमारे चार कोटी रुपयांचा ठेवी जमा केल्या आहेत.त्यावर 81 लाखांचे व्याज मिळालेले आहे. युको बँक, विजया बँक, स्टेट बँक ऑफ मैसूर, आयडीबीआय, देना बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकमध्येही लाखो रुपयांच्या ठेवी पालिकेने साठवून ठेवल्या आहेत. इंडियन बँकमध्ये 1.3 कोटी रुपयांच्या ठेवी पालिकेने करून ठेवल्या आहेत. या विविध ठेवींवरून पालिकेला  जवळपास सात कोटी रुपये इतके व्याज मिळालेले आहे, पण तोही पैसा तसाच खात्यांवर पडून आहे. हे पैसे विकासकामांसाठी वापरण्याऐवजी कोणालाही त्याचा थांगपत्ता लागू न देता तसाच निधी साठवून ठेवण्यात आल्याबद्दल नगरसेविका डोरिस टेक्सेरा आणि मनोज मसुरकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

एचडीएफसी बँकेला मडगाव पालिकेने सर्वात जास्त व्यवसाय पुरवलेला आहे, ज्यात बारा कोटी रुपयांच्या कायम ठेवी, आणि तीन वेगवेगळ्या बचत खात्यांच्या माध्यमातून सुमारे साडे तेरा कोटी रुपये एचडीएफसी बँकेत जमा करण्यात आले आहेत.