Tue, Mar 26, 2019 23:54होमपेज › Goa › गोव्यात पदे ६४ अन् उमेदवार २ हजार 

गोव्यात पदे ६४ अन् उमेदवार २ हजार 

Published On: Jan 30 2018 1:23AM | Last Updated: Jan 30 2018 1:22AMपणजी : प्रतिनिधी

कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येणार्‍या 40 कनिष्ठ लिपिक तसेच 24 डाटा एंट्री ऑपरेटर अशा एकूण 64 पदांसाठी मुलाखत देण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दोन हजारहून अधिक इच्छुक  उमेदवारांनी  सोमवारी  गर्दी केली. त्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली.   

मुलाखतीसाठी दोन हजाराहून अधिक इच्छुक उमेदवारांनी उत्तर  गोवा  जिल्हाधिकारी  कार्यालयाबाहेर   सकाळी 6 वाजल्यापासून रांग लावली होती. जिल्हाधिकार्‍यांना कार्यालयातून बाहेर येऊन प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर मुलाखती घेण्यात येत असून इतरांनी थांबू नये, असे उमेदवारांना समजवावे लागले. 

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 2 ते  10 महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर 40  कनिष्ठ लिपिकांची  पदे  तसेच  24 डाटा एंट्री ऑपरेटरची पदे भरण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये  जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या दोन्ही पदांसाठी दरमहा प्रत्येकी 16 हजार 756 रुपये इतके वेतन दिले जाणार आहे.  

या  जाहिरातीत  सोमवार, दि.29 रोजी पणजी येथील  उत्तर गोवा  जिल्हाधिकारी कार्यालयात   सकाळी 10 वाजल्यापासून प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार  मुलाखती  घेतल्या जातील, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. 

मुलाखत देण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांनी  रांगा लावण्यास सुरुवात केली होती.  जिल्हाधिकारी कार्यालयापासून ही रांग पोलिस मुख्यालय, शासकीय मुद्रणालय  ते  पणजी  वाहतूक पोलिस स्थानकापर्यंत लांबली होती. यात मुले-मुली मिळून दोन हजारांहून अधिक इच्छुक उमेदवारांचा समावेश होता. त्यामुळे या परिसरात काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करून स्थिती नियंत्रणात आणावी लागली. 

प्रथम 360 जणांना मुलाखतीची संधी

कनिष्ठ लिपिक पदासाठी  पहिल्या  येणार्‍या 235 तर डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी प्रथम  येणार्‍या  125 इच्छुक  उमेदवारांच्याच मुलाखती घेतल्या जातील, असेही नमूद करण्यात आले होते.