Fri, May 29, 2020 09:44होमपेज › Goa › ६४ लाखांचे अमली पदार्थ जप्त

६४ लाखांचे अमली पदार्थ जप्त

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 12:52AM

बुकमार्क करा

पेडणे : प्रतिनिधी

पेडणे पोलिसांनी हरमल येथे मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास केलेल्या कारवाईत संशयित सर्गियस व्हिक्टर मांका (वय 31) आणि स्टॅमिले सेबेस्तियांव (25) या दोन जर्मन नागरिकांना अटक करून त्यांच्याकडील 64 लाख रुपये किमतीचा 64 ग्रॅम एलएसडी हा अमली पदार्थ  जप्त केला. हरमल येथील एका गेस्ट हाऊसमध्ये राहणार्‍या या दोघा जर्मन नागरिकांना पेडणे पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.

पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना चार दिवसांपूर्वी मिळाली होती. पोलिस कॉन्स्टेबल प्रेमनाथ सावळ देसाई यांनी दोन्ही संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचला होता.

पेडणे पोलिसांनी अमलीपदार्थ विरोधी कायद्यानुसार, संशयितांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, हे दोघे संशयित दि. 13 नोव्हेंबरपासून गोव्यात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर, उपनिरीक्षक सागर धाटकर, प्रसाद तुयेकर, प्रेमनाथ सावळ देसाई, संदीप गावडे, स्वप्नील शिरोडकर, अनिषकुमार पोळे, फोंडू गावस, शैलेश पार्सेकर, योगेश गावकर आणि प्रकाश पाळणी यांनी ही कारवाई केली.