Sun, Jul 21, 2019 02:18होमपेज › Goa › कळंगुट पंचायतीत ४८ लाखांचा घोटाळा 

कळंगुट पंचायतीत ४८ लाखांचा घोटाळा 

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 28 2018 12:13AMम्हापसा : प्रतिनिधी 

माजी पंचायत मंडळातील सदस्यांनी इतरांच्या मदतीने कळंगुट  पंचायतीमध्ये 47 लाख 88 हजार 68 रूपयांचा घोटाळा केल्याची तक्रार पंचायत सचिव रघुवीर गावकर यांनी कळंगुट पोलिस स्थानकात दाखल केली आहे, अशी माहिती प्रभारी सरपंच सुदेश मयेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  याप्रकरणी  पोलिसांनी तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी पंचायत सदस्य शॉन मार्टिन्स, दिनेश सिमेपुरूषकर, पूजा मठकर, फ्रान्सिस रॉड्रिगीस व पंचायत सचिव रघुवीर बागकर उपस्थित होते.

नव्या पंचायत मंडळाने 19 जून 2017 मध्ये पंचायतीचा ताबा स्वीकारला होता. त्यावेळी ‘कॅश इन हँड’ 47,88,068 रूपये असल्याचे दाखवण्यात आले होते. पंरतु, ही रक्कम बँकेत किंवा इतर खर्चात दाखवण्यात आली नाही. हे 47 लाख 88 हजार रूपये कसे आणि कुठे गायब झाले? कोणी खाल्ले हे समजण्यास मार्ग नाही. याची सखोल चौकशी करण्यासाठी डी.एन. वेंगुर्लेकर या चार्टर्ड अकाऊंटंटकडे जबाबदारी सोपवण्यात आली. पण त्यांनाही वरील रक्कम कुठे वापरली गेली हे कळाले नाही. ‘कॅश इन हँड’ चा आकडा इतका मोठा असूच शकत नाही. त्यामुळे हा गैरप्रकार असल्याचे दिसून येते, असेही मयेकर म्हणाले.

पंचायतीच्या  आर्थिक अहवालात 2013-14 या कालावधीत 5,96,340 व 47,88,068 इतकी मोठी रक्कम ‘कॅश इन हँड’ म्हणून दाखवण्यात आली. लेखा अहवालातही कॅश बुक सरपंचांनी सह्या न करता ठेवल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. तत्कालीन  पंचायत सचिवांनी  यासंदर्भात गटविकास अधिकारी  किंवा इतर वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार नेली नाही. 2011 ते 2016 या काळात इथे व्यवहार व प्रशासन सांभाळणार्‍यांनी या रकमेचा पाठपुरावा केला नाही. त्यामुळे या जनतेच्या पैशांचा अपव्यय झाल्याचे मयेकर यावेळी म्हणाले. 

या गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 119, 379, 381, 409, 408, 406 ,417, 418, 120 बी व 107 या कलमांखाली गुन्हा नोंदवून संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनी केल्याचे प्रभारी सरपंच सुदेश मयेकर यांनी सांगितले.

Tags : Goa, Kalangut Panchayat, 48 lakh scam,