Mon, Aug 19, 2019 11:58होमपेज › Goa › मोपा परिसरातील 14 नव्हे 4500 घरांना धोका

मोपा परिसरातील 14 नव्हे 4500 घरांना धोका

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 03 2018 1:38AMपेडणे : प्रतिनिधी

राज्य सरकारने चुकीची माहिती हरित लवादाला दिल्याने मोपा विमानतळ परिसरातील  56 हजार झाडे तोडण्याची परवानगी हरित लवादाने दिली. तसेच या परिसरातील केवळ  14 नव्हे तर पाच गावांतील 4500 घरांना भविष्यात धोका पोहोचू शकतो, असे गोंयचो आवाज व कुळ मुंडकार संघर्ष समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत रामकृष्ण जल्मी यांनी सांगितले. मोपा पीडितांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.    

पेडणेत तालुका कुळ मुंडकार संघर्ष समिती व गोंयचो आवाज संघटनेतर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बहुजन समाज संघटनेचे निमंत्रक दीपेश नाईक, पेडणे भंडारी समाजाचे अध्यक्ष उमेश तळवणेकर, भारत बागकर, दुर्गादास गावकर, नारायण मयेकर, नारायण गडेकर, उत्तम कशाळकर, दामोदर नाईक, नारायण साळगावकर आदी उपस्थित होते. 

पाचही गावांत कष्टकरी, शेतकरी लोक राहतात, या लोकांचे हित हरित लवादाने व गोवा सरकारने लक्षात घेतले पाहिजे, असे  रामकृष्ण जल्मी यांनी सांगितले. कुळ मुंडकारांच्या जमिनी, त्यांची घरे अजून त्यांच्या नावावर झालेली नाहीत. त्या जमिनी व घरे लुटण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही,असे जल्मी म्हणाले. मोपा विमानतळाच्या कामांमुळे आतापर्यंत कितीजणांना नोकर्‍या मिळाल्या, असा सवाल करत शेतकर्‍यांच्या जमिनी व्यावसायिकांना देण्याचा हा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. 

मोपाग्रस्त शेतकर्‍यांना वाढीव भाव द्यावा, असे बहुजन युनायटेड गोवाचे निमंत्रक दीपेश नाईक यांनी सांगितले. अनेक जमीन मालकांकडे जन्म, मृत्यू व लग्नाचे दाखले नसल्याने मोबदला मिळविताना अडचणी येत आहेत, असेही 
म्हणाले. 

2017च्या निवडणुकीत मगो पक्षाने कुळ मुंडकारांवरील अन्याय दूर करून विधेयक आणण्याचा जाहीरनाम्यावर निवडणूक लढवून जिंकली. मात्र, त्यानंतर सत्ताधार्‍यांना कुळांचा विसर पडला ,अशी टीका पेडणे गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष उमेश तळवणेकर यांनी केली. भारत बागकर व दुर्गादास गावकर यांनीही विचार मांडले.