Sat, Jul 20, 2019 21:17होमपेज › Goa › ‘जुने गोवे ते दोना पावला’मार्गावर ४५० सीसीटीव्ही : कुंकळ्येकर

‘जुने गोवे ते दोना पावला’मार्गावर ४५० सीसीटीव्ही : कुंकळ्येकर

Published On: May 26 2018 1:50AM | Last Updated: May 26 2018 12:16AMपणजी : प्रतिनिधी

पणजीला स्मार्ट सिटी  बनवण्याच्या उद्देशाने ‘गोवा इंटेलिजंट  सिटी मॅनेजमेंट सिस्टिम’ अंतर्गत जुने गोवे ते दोना पावला या मार्गावर 450 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबरोबरच सेन्सर पार्किंग, नागरिकांसाठी विशेष सुविधा कक्ष तसेच पणजीसाठी विशेष अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करू, अशी माहिती इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि.चे संचालक सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी पणजीत पत्रकार परिषदेत दिली.

गोवा इंटेलिजंट सिटी मॅनेजमेंट सिस्टिमसाठीची कामाची निविदा जूनच्या मध्यापर्यंत जारी केली जाईल. त्यानुसार वरील सर्व कामे  येत्या 7-8   महिन्यांत पूर्ण होतील, असेही त्यांनी सांगितले.

कुंकळ्येकर म्हणाले, स्मार्ट सिटी म्हणजे शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्याबरोबर सुरक्षाही पुरवणे होय. त्यानुसार गोवा इंटेलिजंट सिटी मॅनेजमेंट सिस्टिम योजनेंतर्गत जुने गोवे ते दोनापावला मार्गावर 450 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर चार ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या कॅमेर्‍यांमध्ये अशी विशेष तरतूद असेल ज्यामुळे संबंधित मार्गावरून जाणार्‍या प्रत्येक वाहनांचा क्रमांक टिपला जाईल. ज्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करणे शक्य होईल. याशिवाय एखादी संशयास्पद व्यक्ती फिरत असल्यास त्याची माहितीही मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. या योजनेंतर्गत  शहरात मोफत वाय फाय,  घनकचरा व्यवस्थापनाची दर्जा  वृध्दी, शहरातील सुमारे 4  हजार   पार्कींग ठिकाणांना सेन्सर बसवणे, नागरिकांच्या तक्रारी नोंदवून त्यांचे निवारण करण्यासाठी मदत कक्ष स्थापन करणे,  पणजीसाठी अ‍ॅप तयार करणे ज्याद्वारे नागरिकांना आपली बिले ऑनलाईन पद्धतीने भरणे शक्य होईल, अशा सुविधांचा समावेश असेल. या सर्व सुविधा पुरवण्याचे काम एकाच कंपनीला निविदेव्दारे दिले जाणार आहे. यासाठी आतापर्यंत  4  कंपन्यांनी  बोली लावली असून ते कशाप्रकारे सेवा पुरवतात, हे पाहण्यासाठी  त्यांच्याकडून प्रायोगिक तत्वावर काम करून घेतले जात  आहे, असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.

इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि.चे कार्यकारी व्यवस्थापक स्वयंदीप्त पाल चौधरी यावेळी उपस्थित होते.