पणजी : प्रतिनिधी
अमली पदार्थविरोधी पथकाने पर्रा बार्देश येथे बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत 4 लाख रुपयांचा अमली पदार्थ साठा जप्त केला. यावेळी हा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पॉल डिसोझा (वय 54, सेंट अँथनीवाडो, हणजूण) व दिगंबर मांद्रेकर (52, मजलवाडो, हणजूण) या दोन संशयितांना अटक केली.
प्राप्त माहितीच्या आधारे अमली पदार्थविरोधी पथकाचे उपनिरीक्षक प्रितेश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान पॉल डिसोझा याच्याकडून 25 ग्रॅम एमडीएमए हा अमली पदार्थ व 9 हजार रुपये रोख जप्त करण्यात आले. दिगंबर मांद्रेकर याच्याकडून 15 ग्रॅम एमडीएमए हा अमली पदार्थ, 5 हजार रुपये रोख, मोबाईल फोन तसेच डिओ स्कूटर जप्त केली.
पर्रा येथील सत्पुरुष गेस्ट हाऊससमोर बुधवारी (दि.3) रात्री 11.45 ते गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. दोन्ही संशयितांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.