Tue, Apr 23, 2019 23:47होमपेज › Goa › पर्वरी-पणजी-बांबोळी मार्गावर ४ तास प्रचंड वाहतूक कोंडी

पर्वरी-पणजी-बांबोळी मार्गावर ४ तास प्रचंड वाहतूक कोंडी

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 1:47AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाण अवलंबितांनी सोमवारी  पणजीत धडक दिल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. पर्वरी-पणजी-बांबोळी मार्गावर सुमारे चार तास वाहतूक कोंडी झाली होती. राजधानी पणजीतील अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.  

खाण व्यवसाय पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीसाठी खाण अवलंबितांनी सकाळी 8.30 वाजल्यापासून क्रांती सर्कलकडे जमायला सुरूवात केली. तेथून ते मोर्चाने पणजीत येणार होते. पोलिसांनी त्यांना क्रांती सर्कलवरच अडविले. त्यामुळे मांडवी पुलावर  पूर्णपणे वाहतूक कोंडी झाली.  

क्रांती सर्कलजवळ मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा होता. पणजीत वाहतुकीची संभाव्य कोंडी लक्षात घेऊन गोमेकॉ-बांबोळी- पणजी मार्गावरील वाहतूक कालापूरमार्गे वळविण्यात आली. पणजीत झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेता वाहनचालकांनी बेती फेरी मार्गे शहराबाहेर पडण्यासाठी एकच गर्दी केली.  बेती फेरी धक्क्यावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती.  क्रांती सर्कलवर मेगा ब्लॉक झाल्याने  म्हापसा-पणजी  मार्गावर  वाहतूक व्यवस्था पूर्णपणे  कोलमडली.

पणजीत  ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी  पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दिवजा सर्कलकडून क्रांती सर्कलच्या दिशेने येणारी वाहतूक वळविण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर घातलेले  बॅरीकेडस्  तोडावे लागले. बॅरिकेडस् बाजूला सारून वाहतुकीला वाट करुन देण्यात आली. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर दुपारी एक वाजता आंदोलकांशी चर्चा करत असताना  काही वाहनचालक क्रांती सर्कलच्या दिशेने आले असता मोर्चेकर्‍यांनी  त्यांना अडविले. आमच्या पोटापाण्याचा प्रश्‍न आहे, असे  सांगून   वाहनचालकांशी  वाद घातला. काही वाहन चालक व आंदोलकांमध्ये भांडणे जुंपली. 

सुमारे दीड तास वाहन चालकांना अडवून ठेवण्यात  आले. संतप्‍त वाहन चालकांनी हॉर्न वाजवायला सुरवात केली. वाहतूक अधिकच खोळंबल्याने मोर्चा घेऊन आलेल्या लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज सुरू करताच रस्ते 

मोकळे करून आंदोलनकर्ते पळाले.अग्नीशामक दलाच्या व पोलिसांच्या वाहनांचीही मोडतोड करण्यात आली.