Mon, Apr 22, 2019 03:56होमपेज › Goa › केंद्राकडून 4 वर्षांत 30 हजार कोटींचा निधी

केंद्राकडून 4 वर्षांत 30 हजार कोटींचा निधी

Published On: May 29 2018 1:42AM | Last Updated: May 28 2018 11:24PMपणजी : प्रतिनिधी

केंद्राच्या ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ सरकारने मागील चार वर्षांत राज्याला विविध विकासकामांसाठी सुमारे 30 हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यातील सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत चाललेल्या विकासकामांसाठी आहे. यासाठी राज्यातील जनतेच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्रिमंडळ सदस्यांचे आपण आभार मानत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. 

आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ढवळीकर बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्राच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत गोव्याला याआधी कधीही मिळाला नाही, इतका निधी व मदत प्राप्त झाली आहे. राज्यातील रस्ते, पूल, रस्ता रूंदीकरण आदी कामांसाठी मागील  चार वर्षांत सुमारे 15 हजार कोटी मंजूर झाले असून त्यातील 8 हजार रूपयांची कामे सध्या सुरू आहेत. उर्वरीत 7  हजार कोटींच्या कामांना तत्वत: मान्यताही  मिळाली आहे. याशिवाय भारतमाला प्रकल्पांतर्गत, राज्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे सुमारे 220 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यासाठीच्या 6 हजार कोटी रूपयांच्या निधीला तत्वत: मान्यता मिळाली आहे. 

सागरमाला प्रकल्पांतर्गत राज्यातील सहा जेटींच्या पुनर्बांधणीसाठी 97 कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. याशिवाय करासवाडा ते खांडेपार या मार्गावरील 105 कि.मी. रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी सुमारे 800 कोटी रूपयेही मंजूर झाले आहेत. ‘प्रधानमंत्री सडक योजने’अंतर्गत अतिरिक्त 239 कोटी रुपये मिळणार आहेत. राज्यातील मोले-खांडेपार, फोंडा-जुने गोवे,  बोरी पूल-फोंडा, एमपीटी ते दाबोळी विमानतळ तसेच महामार्गाच्या दुरूस्तीसाठी महत्त्वाचा निधीही केंद्राकडून प्राप्त झाला आहे. आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सुमारे 15 ते 16 वर्षे काम केले असून या कालावधीत केंद्राकडून राज्याला वर्षाला फक्त 40 ते 45 कोटी रूपयेच पदरात पडत असत. ‘रालोआ’प्रणित केंद्र सरकारने पहिल्यांदाच राज्याला असा भरीव निधी दिला असल्याचे ढवळीकर म्हणाले.  

‘मुख्यमंत्रिपदाची धुरा वाहण्याची मानसिक तयारी’

राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा वाहण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार आहे, असे एका प्रश्‍नावर मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. ते म्हणाले,   जनता आपल्या कामगिरीवर आनंदी असेल तर आपण मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही स्वीकारण्यास तयार आहे. मात्र, सध्या या विषयाबाबत अधिक बोलणे संयुक्‍तीक नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा द्यावा, की मगोने स्वतंत्ररित्या उमेदवार उभा करावा, याचा निर्णय मगोची केंद्रीय समिती घेणार आहे, असेही ढवळीकर म्हणाले.