Sun, Aug 18, 2019 15:20होमपेज › Goa › पंचायतींना इमारत पुनर्बांधणीसाठी 3 कोटींचा निधी : पाऊसकर

पंचायतींना इमारत पुनर्बांधणीसाठी 3 कोटींचा निधी : पाऊसकर

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 20 2018 12:25AMपणजी : प्रतिनिधी 

पंचायत संचालनालयाकडून राज्यातील सर्व पंचायतींच्या इमारती पुन्हा बांधून देण्यात येणार आहेत.   प्रत्येक पंचायतीला यासाठी 3 कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून, जीएसआयडीसीनेबांधकाम सुरू केले आहे. आतापर्यंत 55 टक्के पंचायतींच्या इमारतींचे पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती जीएसआयडीसीचे अध्यक्ष तथा आमदार दीपक पाऊसकर यांनी दिली. 

पाऊसकर म्हणाले, राज्यातील सर्व पंचायतींच्या इमारती कित्येक वर्षांपूर्वीच्या असून, जीर्ण झाल्या आहेत. काही पंचायतींचे कामकाज भाडोत्री जागेत सुरू आहेत. या सर्व पंचायतींना इमारत बांधून देण्यात येईल. पंचायतींना जागा शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इमारत बांधणीसाठी जागा तसेच टीसीपी व अन्य परवानग्या तयार असलेल्या पंचायतींनी जीएसआयडीसी कडे कागदपत्रे सादर करावीत, असे पंचायतींना सांगण्यात आले आहे.

जीएसआयडीसीकडून सध्या  ज्या पंचायतींकडे जागा व अन्य कागदपत्रे तयार आहेत, अशा पंचायतींची कामे सुरू करण्यात आली आहेत. 2020 पर्यंत राज्यातील सर्व पंचायतींना स्वत:ची इमारत असेल.  या नवीन इमारतींमध्ये एसी, फर्निचर, स्वच्छतागृह अशा सर्व आवश्यक बाबी पुरविल्या जाणार आहेत. राज्यात एकूण 190 पंचायती असून यातील 55 टक्के पंचायतींची कामे सध्या सुरू आहेत, असेही पाऊसकर यांनी सांगितले. 

खाण बंदी तोडग्यासाठी उद्या बैठक

खाण बंदीवर तोडगा काढण्यासाठी पर्वरी येथे सचिवालयात 21 जून रोजी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बैठक बोलावली आहे. ही बैठक मंत्री, आमदार, खाण संचालक व अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्या उपस्थितीत होईल. या बैठकीत 1987 कायद्याप्रमाणे लीजधारकांना मुदत वाढ देण्यात यावी, यावर चर्चा होईल. खाण लीजधारकांना 50 वर्षे पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी भूमिका सरकारची असेल. न्यायालयाकडे 2037  पर्यंत मुदतवाढीची मागणी करावी, असा सरकारचा विचार आहे. फेरविचार याचिका दाखल करण्याबद्दल अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा सुरू आहे. बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
- दीपक पाऊसकर, अध्यक्ष जीएसआयडीसी