होमपेज › Goa › भाजपाचेच ३ आमदार काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक 

गोव्यात भाजपचे आमदार काँग्रेसच्या वाटेवर?

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 06 2018 12:08PMपणजी : प्रतिनिधी

भाजपाचेच तीन आमदार काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक असून काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार  ही अफवा असल्याचा दावा मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी पणजी येथील पत्रकार परिषदेत केला. भाजपमध्ये आपण  प्रवेश करणार, ही अफवा भाजपकडूनच पसरवली जात आहे. आपण कुणाशीच संपर्क साधला नसून कुणीही आपल्याशी संपर्क साधला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सोपटे म्हणाले, आपल्यासह काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. उलट भाजपचेच तीन  आमदार काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याच पक्षात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत त्या पक्षात कशाला  कोण जाईल.  आपले आमदार फुटून  काँग्रेसमध्ये जाऊ नयेत, सरकार पक्षाचे संख्याबळ कमी होऊ नये, म्हणून भाजपचे नेते काँग्रेसच्या आमदारांविषयी अशा अफवा पसरवत असल्याची टीका त्यांनी केली. आपण मागील दीड वर्षे  काँग्रेसचा आमदार आहे.     

मात्र या काळात ना कधी आपण भाजपात प्रवेश करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला, ना त्यांनी कधी आपल्याकडे केला. राजकारणात अशा प्रकारच्या अफवा या सुरुच असताच,  असेही त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या मुख्यमंत्री अनुपस्थित आहेत. त्यांचे मंत्री देखील आजारी असून ते देखील राज्यात नाहीत. त्यामुळे तसे पाहता त्यांचे संख्याबळ देखील कमीच आहे. राज्यात प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले असून सरकार झोपल्याचा भास होत आहे.  गणेश चतुर्थीनजीक आली असतानाही   गावागावांमध्ये   रस्त्यावरील पथदीप पेटत नाहीत. याबाबत  वीज खात्याकडे संपर्क साधला असता या पथदीपांच्या कामांसाठीची प्रशासकीय मंजुरी  मिळाली नसल्याचे  सांगितले जात आहे,असेही   त्यांनी सांगितले.