होमपेज › Goa › खाणबंदीमुळे ३,५०० कोटींचा महसूल बुडणार 

खाणबंदीमुळे ३,५०० कोटींचा महसूल बुडणार 

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:22AMपणजी : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या 15 मार्च 2018 पासून होणार्‍या खाणबंदीमुळे राज्याचा सुमारे 3,500 कोटी रुपयांचा महसूल बुडणार असून, सुमारे 2 लाख खाण अवलंबित बेरोजगार होणार आहेत. हे नुकसान टाळण्यासाठी खाणी सुरू करण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, खाणमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना सोमवारी (दि. 4) भेटणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही राज्याच्या वतीने सोमवारी निवेदन सादर केले जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सध्या आजारी असले, तरी मुख्यमंत्रिपदाचा ताबा त्यांनी कुणाकडेच सोपवलेला नाही. त्यांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांनी गुरुवारी सायंकाळी मंत्रालयात राज्यातील खाण प्रश्‍नासंबंधी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत सर्व पक्षांचे आमदार, खासदार तथा वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना ढवळीकर म्हणाले की, येत्या 15 मार्चनंतर खाणबंदी होणार असून, गोव्याच्या आर्थिक स्थितीला ते बाधक ठरणार आहे. खाणबंदीमुळे सुमारे 3,500 कोटी रुपयांचा राज्याला फटका बसणार आहे. खाणीवर थेट अवलंबून असलेले सुमारे 60 हजार कामगार तथा अन्य     व्यावसायिक, घटक मिळून सुमारे दोन लाख लोकांवर संकट येणार आहे. गोवा राज्य अक्षरश: ‘स्तब्ध’ होणार आहे. या संकटातून वाचवण्यासाठी केंद्राकडून उपाययोजना करण्याची मागणी करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ सोमवारी दिल्लीला जाणार आहे.

विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर म्हणाले की, येत्या 16 मार्चपासून राज्यातील खाण व्यवसाय ठप्प पडणार आहे. ट्रक, बार्ज, अन्य यंत्रे धरून अनेकांच्या संसारावर संकट कोसळणार आहे. कसेही करून 16 मार्चपासून राज्यातील खाणी बंद होता कामा नये, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केंद्राकडून व्हावी, अशी मागणी करण्यासाठी केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आहोत. 

खाणमंत्र्यांसह घेणार पंतप्रधानांची भेट

दिल्‍लीला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची सोमवारी सकाळी 10 वाजता, तर केंद्रीय खाणमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची सोमवारी दुपारी 12 वाजता भेट निश्‍चित झाली आहे. त्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यांची भेट झाली नाही, तर राज्याच्या वतीने सोमवारी पंतप्रधान कार्यालयात निवेदन सादर केले जाणार आहे, असे सांगून नेमक्या मागण्या काय आहोत, ते नंतर जाहीर केले जाणार आहे, असे ढवळीकर म्हणाले.