Sun, May 26, 2019 16:40होमपेज › Goa › ‘स्मार्ट पणजी’साठी ‘एडीबी’कडून ३.५ कोटी 

‘स्मार्ट पणजी’साठी ‘एडीबी’कडून ३.५ कोटी 

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 30 2018 1:36AMपणजी : प्रतिनिधी

राजधानी पणजीतील सांत इनेज खाडीचे सौंदर्यीकरण आणि 24 तास पाणीपुरवठा या दोन प्रकल्पांसाठी ‘आशिया विकास बँके’तर्फे  3.5 कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती ‘इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि.’च्या  मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्वंयदीप्ता पाल चौधरी यांनी दिली. 

आशिया खंडातील निवडक शहरांच्या विकासासाठी ‘आशिया विकास बँके’कडून दरवर्षी मदतनिधी दिला जातो. ‘स्मार्ट सिटी मिशन’खाली निवड झालेल्या पणजीच्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या तांत्रिक सहाय्य आणि सल्ल्यासाठी सदर बँकेकडून हा निधी दिला जाणार आहे.  शहरातील सुमारे 6 कि.मी. लांबीच्या सांतइनेज खाडीच्या सुशोभीकरण आणि दुरूस्तीसाठी  गरजेचा असलेला निधी यामुळे प्राप्त होणार आहे. शहरात पर्यावरण समतोल राखण्यासाठी जलस्त्रोताचे संवर्धन आणि रक्षण करण्यासाठी बँकेने सांतइनेज खाडीच्या दुरूस्ती आणि सुशोभीकरण प्रकल्पाला मदत करण्याचे मान्य केले असल्याचे चौधरी म्हणाले.  

पणजीच्या  दुसर्‍या प्रकल्पाखाली, शहरातील सर्व भागात 24 तास पाणी पुरवठा करण्याच्या योजनेलाही निधी  मिळणार आहे. या दोन्ही योजनांसाठी जागतिक दर्जाच्या सल्लागार कंपन्यांची मदत मिळण्यासाठीही सदर बँक सहाय्य करणार आहे. शहरात पाणी पुरवठा सुरळीत होत असला तरी काही भागांत एक ते सात तासांच्या आत पुरवठा होत आहे. पाणी पुरवठ्याची ही व्यवस्था सुधारण्यासाठी ओपा-खांडेपार येथून पणजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 27 एमएलडीचा विस्तारीत प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच, शहरातील पाणी वाहिन्या, जुने मीटर बदलण्याचे कामही हाती घेतले जाणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.