Wed, Jun 26, 2019 12:22होमपेज › Goa › कोडलीतून शेवटच्या दिवशी २९०० ट्रक खनिज वाहतूक

कोडलीतून शेवटच्या दिवशी २९०० ट्रक खनिज वाहतूक

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 16 2018 12:33AMमडगाव : प्रतिनिधी

खनिज व्यवसाय गुरुवार दि.15 मार्चपासून बंद करण्याचे निर्देश खाण खात्याकडून जारी झाल्याने कोडली येथील सेझा गोवा वेदांता कंपनीने गुरुवारी शेवटच्या दिवशी 2900 ट्रक इतकी खनिज वाहतूक करून खनिजाचा सर्व व्यवसाय स्वतःहून बंद  केला.

‘सेझा गोवा’ चे अधिकारी राम देसाई यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले, की गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत एकूण दोन हजार नऊशे ट्रक खनिजाची वाहतूक करण्यात आली. खाणीवरील उत्खनन केलेल्या सर्व खनिजाची वाहतूक करण्यात आली असून खाण खात्याने दिलेल्या निर्देशानुसार खाणीवरील सर्व प्रचलन गुरुवारी पूर्ण करण्यात आले आहे.कोडली येथील सेझा गोवा खाण कंपनीतील सर्व यंत्रणा या पूर्वीच गुड्डेगाळ येथील जागेत आणून ठेवण्यात आली होती. स्क्रिनिंग मशिन्स व शेवाळ आदी यंत्रे गुरूवारी पुन्हा त्या ठिकाणी हलविण्यात आली आहेत. अधिकारी देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार खाण खात्याकडून आलेल्या सर्व निर्देशांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. बहुतांश यंत्रे बाहेर काढण्यात आली असून लहान  यंत्रे शुक्रवारपर्यंत हलविली जातील, असे सांगण्यात आले.

दरम्यान, दक्षिण गोव्यातील नामांकित खाण कंपनी च्या कामगारांना व्यवस्थापनाने कामावरून ब्रेक घेण्याची सूचना केल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर पुन्हा कामावर घेतले जाईल, असे आश्वासन या कामगारांना देण्यात आलेले आहे. खाण बंदीच्या निर्णयामुळे खाणव्याप्त भागात सध्या निराशेचे वातावरण  पसरले आहे.

ट्रकमालक संघटनेची उद्या सावर्डेत बैठक

दरम्यान, खाणबंदीच्या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी दक्षिण गोवा प्रोग्रेसिव्ह ट्रक मालक संघटनेने 17 मार्च रोजी सकाळी दहा वाजता सावर्डे येथील कामाक्षी सभागृहात खाण अवलंबितांची बैठक बोलावली आहे.