होमपेज › Goa › फर्मागुडीत बस अपघातात 29 जखमी 

फर्मागुडीत बस अपघातात 29 जखमी 

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 04 2018 12:58AMफोंडा : प्रतिनिधी

फर्मागुडी येथील सर्कलजवळ गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास कदंब बस व खासगी प्रवासी बस यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही चालकांसह 29 जण जखमी झाले. त्यापैकी 8 जखमींना अधिक उपचारासाठी गोमेकॉत हलविण्यात आले आहे. अपघातानंतर बसच्या केबिनमध्ये अडकून पडलेल्या दोन्ही बसचालकांना अग्‍निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी बाहेर काढून इस्पितळात नेले. फोंडा पोलिसांनी कदंब बसचालक रूपेश गावस (वय 44, रा. पाळी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत असलेल्या जखमींमध्ये प्रकाश परब (24, दुर्भाट), चंपा गावडे (45, जुने गोवे), रोमालदिना फर्नांडिस (44, फोंडा), जुस्तियन रॉड्रिग्ज (64, फोंडा), दामोदर नाईक (46, आडपई), अलोक कुमार (53, कुर्टी), श्रीकृष्ण बोरकर (54, कुर्टी) व कदंब बसचालक रूपेश गावस यांचा समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीए-03-एक्स-0114 क्रमांकाची कदंब बस फोंड्याहून पणजीकडे जात होती.फर्मागुडी येथील सर्कलच्या पुढे गेली असता  समोरून येणार्‍या (जीए-05-डब्ल्यू-4466) क्रमांकाच्या खासगी बसला कदंब बसची जोरदार धडक बसली. यात दोन्ही बसमधील प्रवासी जखमी झाले.

अपघातानंतर फर्मागुडी परिसरात वाहतूक कोंडी झाली. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना इस्पितळात नेण्यासाठी तीन 108 रुग्णवाहिकांची मदत घेण्यात आली. याशिवाय काही जणांनी स्वतःच्या वाहनातून जखमींना  इस्पितळात नेले. यात उपजिल्हा इस्पितळाचे डॉक्टर केरकर यांनीही मदतकार्यात भाग घेतला. जखमींना इस्पितळात नेल्याची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईकांनी उपजिल्हा इस्पितळात गर्दी केली. अपघातात दोन्ही बसच्या केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकांना अग्‍निशामक दलाच्या फोंडा येथील कर्मचार्‍यांनी बाहेर काढून इस्पितळात नेले. कदंब बस चालक रूपेश गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने बस सरळ दुसर्‍या बाजूने गेल्याने हा अपघात घडला. अपघातात दोन्ही बसच्या दर्शनी भागाची मोठ्या प्रमाणात हानी झाली.पोलिसांनी क्रेनच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्त बसेस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. फोंडा पोलिस स्थानकाचे उपअधीक्षक महेश गावकर व निरीक्षक हरिश मडकईकर यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची पाहणी केली. हरिश मडकईकर यांनी  सांगितले की, कदंब बसचालक रूपेश गावस यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन हाकल्याप्रकरणी गुन्हानोंदवला आहे.

Tags : Goa, 29, injured, bus, accident