Fri, Jul 19, 2019 05:02होमपेज › Goa › कुंकळ्ळीत २३ व्यावसायिकांचे वजनकाटे जप्त

कुंकळ्ळीत २३ व्यावसायिकांचे वजनकाटे जप्त

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 08 2018 12:14AM

बुकमार्क करा
मडगाव : प्रतिनिधी

वजन माप खात्याच्या मडगाव, सांगे, कुडचडे आणि वास्को विभागाने रविवारी कुंकळ्ळीतील आठवडा बाजारात संयुक्तपणे छापा टाकून ग्राहकांना फसवणार्‍या कर्नाटकातील किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून 20 आणि चिकन विक्री स्टॉलवरील 3 वजनकाट्याची यंत्रे जप्त केली. या कारवाईमुळे ग्राहकांना लुबाडणार्‍या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक हा छापा टाकण्यात आल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. एका बिगर सरकारी संघटनेने वजन काट्यासंबंधी संशय व्यक्त करून या प्रकाराच्या चौकशीची वजन माप खात्याकडे केली होती. अरुण पंचवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. रविवारी आठवडा बाजाराचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात व्यापारी कुंकळ्ळी बाजारात येतात, याची माहिती असल्याने एकूण चार निरीक्षकांनी या कारवाईत भाग घेतला. वजन माप खाते, मडगाव विभागाचे निरीक्षक विकास कांदोळकर यांनी माहिती दिली, की ठराविक काळानंतर इलेक्ट्रॉनिक व साध्या वजन काट्यांची तपासणी करणे नियमाप्रमाणे बंधनकारक आहे. बिगर सरकारी संघटनेने दिलेल्या तक्रारीनंतर बाजारपेठेतील भाजी आणि फळविक्रेत्यांसह बिस्कीट विक्रेत्यांच्या वजन काट्यांची तपासणी केली असता, त्यांनी कधीच वजन माप खात्याकडून या यंत्रांची तपासणी करून घेतली नसल्याचे आढळले.

त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वजनकाट्याची तपासणी करून न घेतल्यामुळे ग्राहकांना याचा फटका बसतो. वीस किरकोळ विक्रेते व तीन स्थानिक चिकन विक्रेत्यांची यंत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती कांदोळकर यांनी दिली. या कारवाईत मडगाव कार्यालयाचे निरीक्षक विकास कांदोळकर, शुबर्ट डिकॉस्ता, लीलाधर कुंभारजुवेकर आणि  सृजन राणे यांच्यासह साहायक निरीक्षक के. व्ही. कोसंबे, सुधीर गावकर, पास्कॉल वाज, मेलविन फुर्तादो आणि विवेक वाडेकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.