Sun, Dec 16, 2018 20:58होमपेज › Goa › खवय्यांना मासेमारी  बंदी उठण्याचे वेध

खवय्यांना मासेमारी  बंदी उठण्याचे वेध

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 29 2018 11:35PMपणजी : प्रतिनिधी

महाराष्ट्र, कर्नाटक राज्यासह गोव्यातही 61 दिवसांची मासेमारी बंदी येत्या बुधवारी (दि. 1 ऑगस्ट) संपुष्टात येणार आहे. राज्यातील सुमारे 1500 ट्रॉलर्स आणि त्यावरील कामगार दोन महिन्यांची विश्रांती घेऊन खोल समुद्रात जाण्यासाठी सज्ज होत आहेत. पावसाळ्यात परराज्यातील मासळीमध्ये ‘फार्मेलिन’ हे घातक रसायन लावण्याच्या प्रकाराचा धसका घेतलेल्या गोमंतकीय खवय्यांना मासळी बंदी उठण्याचे वेध लागले आहेत. देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीवर  1 जून ते 31 जुलै 2018 या कालावधीत मासेमारीबाबत समान बंदीकाळ जाहीर करण्यात आला होता. 

ही मासेमारी बंदी काटेकोरपणे पाळण्यासाठी सागरी सुरक्षा पोलिस तथा तटरक्षक दलांनी राज्यातील किनारी भागातील समुद्रावर कडक पहारा ठेवला होता. मासेमारी बंदीचे 61 दिवसांचे कडक पालन करण्यात आल्याने मत्स्यप्रजनन आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

उत्तर गोव्यातील मालीम व शापोरा तसेच दक्षिणेतील कुटबण, वास्को, कुठ्ठाळी आणि तळपण या एकूण सहा जेटीला ठोकलेले सिल मच्छीमार खात्याच्या अधिकार्‍यांकडून मंगळवारी (दि. 31 जुलै) काढण्यात येणार आहे. या सर्व जेटींवर मत्स्य व्यावसायिकांची तसेच ट्रॉलर्सवरील कामगारांची सध्या   लगबग सुरू झाली आहे. ट्रॉलरवर डिझेल, खाद्यपदार्थ तसेच जाळी आदी वस्तूंची साठवणूक करण्याचे काम सुरू झाले असल्याचे एका मच्छीमाराने सांगितले.