होमपेज › Goa › गोव्यात मासळी आयातीवर १५ दिवसांची बंदी

गोव्यात मासळी आयातीवर १५ दिवसांची बंदी

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 19 2018 1:32AMपणजी : प्रतिनिधी

राज्य सरकारने शेजारील राज्यांमधून  होणार्‍या मासळीच्या आयातीवर येत्या 15 दिवसांची बंदी घातली असून, 3 ऑगस्टपर्यंत   हा आदेश लागू राहणार आहे.  राज्यात  आयात होणार्‍या फळे, भाज्या तसेच अन्य सेवनयोग्य वस्तूंमध्येही होणार्‍या  रसायन वापरावर प्रशासन नजर ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या  पत्रकार परिषदेत बुधवारी जाहीर केले.

पर्रीकर म्हणाले, की आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ व अन्य  राज्यांमधून आयात केलेल्या मासळीमध्ये ‘फार्मोलिन’ हे घातक  रसायन आढळल्याने  गेले काही दिवस राज्यात खळबळ उडाली आहे. जनतेच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी आणि गोमंतकियांच्या हितासाठी तातडीची हालचाल म्हणून बुधवारच्या मध्यरात्रीपासून पुढील 15 दिवस मासळी आयातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्यात 61 दिवसांची लागू असलेली मासेमारी  बंदी 31 जुलै  रोजी संपुष्टात येणार असून 1 ऑगस्टपासून स्थानिक मच्छीमार समुद्रात मासळी पकडण्यासाठी जाणार आहेत. ही पकडलेली मासळी बाजारात येण्यासाठी आणखी एक दिवस धरता 3 ऑगस्टपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. ही बंदी अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार घालण्यात आली आहे. 

राज्यात पंधरा दिवस मासळी आयातीवर बंदी असल्याने गोव्यातील खवय्ये तसेच येथे भेट देणार्‍या पर्यटकांना मासळीपासून वंचित रहावे लागणार आहे. केवळ स्थानिक तळ्यात अथवा मानशीतून मिळत असलेल्या थोड्याफार मासळीवर गोवेकरांना विसंबून राहावे लागणार आहे. मासळी आयातीवरील बंदीची अधिसूचना बुधवारी  संध्याकाळी काढण्यात आली.

भेसळ तपासणी यंत्रणा पंधरा दिवसांत : पर्रीकर

अन्न व औषध प्रशासनातर्फे राज्यात कृत्रिमरित्या पिकविलेली फळे तसेच भाज्या  घेऊन येणार्‍या ट्रकवरही लक्ष ठेवले जाणार आहे. प्रशासनाच्या अधिकार्‍यांना राज्याच्या  सर्व सीमांवर तैनात ठेवण्यात येणार असून, पंधरा दिवसांच्या काळात अन्य राज्यांतून मासळीची आयात थांबवली जाणार आहे. या दरम्यान प्रशासनाकडून ‘फार्मोलिन’युक्‍त  मासळी तसेच भेसळयुक्‍त फळे व भाज्या तपासणीसाठी आवश्यक यंत्रणा उभी केली जाणार आहे. यामुळे राज्यातच कधीही मासळी, फळे व भाज्यांवरील चाचणीची सोय उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.