होमपेज › Goa › चिखली पेट्रोलपंपावर 14 लाखांची चोरी

चिखली पेट्रोलपंपावर 14 लाखांची चोरी

Published On: May 29 2018 1:42AM | Last Updated: May 28 2018 11:26PMदाबोळी : प्रतिनिधी 

चिखली येथील  पेट्रोलपंपाच्या कार्यालयातून रविवारी रात्री 14 लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबवल्याची तक्रार निना वाझ यांनी वास्को पोलिसात दाखल केली होती. या प्रकरणी संशयित पवित्रा कुमारी या  सफाई कामगार महिलेला 12 तासांत अटक करून तिच्याकडून चोरीला गेलेला 13 लाख 14 हजार 855  रुपयांची रोकड जप्त करण्यात यश मिळवले. 

वास्को  पोलिस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीची घटना रविवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. चोरी झाल्याची तक्रार निना वाझ यांनी वास्को पोलिस स्थानकात दाखल केली होती. तक्रारीत 14 लाख 19 हजार 700 रुपये चोरीला गेल्याचे म्हटले होते. वास्को पोलिस निरीक्षक नालास्को रापोज तसेच तपास अधिकारी उपनिरीक्षक सर्वेश सावंत आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहचले. संपूर्ण घटनेची चौकशी केल्यानंतर लक्षात आले की, चोरटा स्थानिक असून भागाची माहिती असणारा आहे.

याच महिन्यात झाडूवाली म्हणून नियुक्त केलेल्या पवित्रा कुमारी हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने पेट्रोलपंपावर चोरी केल्याचे कबूल केले. पेट्रोलपंपाच्या मागील बाजूला असलेली काचेची खिडकी फोडून तिने कार्यालयात प्रवेश केला होता. संशयित पवित्रा कुमारी हिला पैसे कुठे ठेवले जातात, याची पुरेपूर माहिती होती. ड्रॉवरची चावीदेखील कुठे ठेवली जाते, याची माहिती होती. चोरलेली रक्कम तिने तिच्याकडील सुटकेसमध्ये लपवून ठेवली होती. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे 14 लाख 19 हजार 700 रुपये चोरीला गेले होते, परंतु तिच्याजवळ 13 लाख 14 हजार 855 रुपये आढळून आले.संशयित पवित्राकुमारी विरोधात भादंसं कलम 154, 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.