Wed, Jul 17, 2019 00:24होमपेज › Goa › खाणबंदीचे शंभर दिवस; पणजीत लाक्षणिक उपोषण

खाणबंदीचे शंभर दिवस; पणजीत लाक्षणिक उपोषण

Published On: Jun 24 2018 1:33AM | Last Updated: Jun 24 2018 12:28AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाणबंदीला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर खाण आंदोलकांनी लाक्षणिक उपोषण केले. खाण आंदोलक सोमवारी (दि.25) आंदोलनाची पुढील कृती ठरवणार आहेत, असे गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे नेते पुती गावकर यांनी सांगितले.

खाणबंदीची ही शंभरी पाळण्यासाठी शनिवारी (दि.23) खाण आंदोलकांनी पणजीसह  राज्यातील अन्य काही भागांमध्ये लाक्षणिक उपोषण केले.

गावकर म्हणाले की, खाणी पुन्हा सुरू करण्याबाबत सरकारकडून केवळ  आश्‍वासने दिली जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात कृती काहीच करण्यात आलेली नाही. सरकारचे याप्रश्‍नी लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. खाणबंदीला 100 दिवस उलटून गेले तरी अजूनही सरकारकडून ठोस पावले उचलण्यात आली नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
खाण  आंदोलकांनी  लाक्षणिक उपोषणाबरोबरच रॅलीदेखील काढली. सरकारकडून खाणप्रश्‍न गांभीर्याने घेण्यात येत नसल्याने खाण आंदोलकांची सोमवारी पणजी येथील आझाद मैदानावर बैठक होईल. या बैठकीत आंदोलनाची पुढील कृती ठरवण्यात येणार असल्याचे गावकर यांनी सांगितले.
खाणी सुरु करण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवले जाणार आहे. जुलै महिन्यात सुरु होणार्‍या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पर्वरी येथील विधानसभेवर धडक मोर्चा नेण्याची योजना असल्याचे यावेळी गावकर यांनी सांगितले.