Thu, May 28, 2020 09:53होमपेज › Goa › सेरूला कोमुनिदादमध्ये महाघोटाळा 

सेरूला कोमुनिदादमध्ये महाघोटाळा 

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 15 2018 12:02AMम्हापसा  : प्रतिनिधी

सेरूला कोमुनिदादच्या जमिनीत 10 हजार प्लॉटस् बनवून ते वरिष्ठ सरकारी अधिकारी व उच्चपदस्थांनी लाटण्याचा प्रकार घडला असून हा  हजारो कोटींचा महाघोटाळा आहे. या प्रकरणाच्या फाईल्सच गायब आहेत, असेही चौकशीवेळी पुढे आले आहे.  या घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून  महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी  मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उत्तर गोवा काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली व ‘न  खाऊंगा, ना खाने दुुंगा’अशी त्यांची घोषणा होती. परंतु गोव्यातील भाजपच्या राजवटीत एवढा मोठा भूखंड घोटाळा ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. जे प्रतिष्ठीत लोक या घोटाळ्यात गुंतलेले आहेत ते बहुतेक मंत्री रोहन खवंटे यांचे निकटवर्तिय असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे, म्हणून त्यांनी राजीनामा देणेच योग्य ठरेल, असे   चोडणकर  म्हणाले.

सेरूला कोमुनिदादचे प्रमुख, उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर असल्याने त्यांना त्वरीत त्या पदावरून हटवावे व या  भूखंड घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे सोपवावी किंवा एखाद्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून घोटाळ्याची सखोल चोैकशी करावी, असेही चोडणकर म्हणाले.

कोमुनिदादच्या कार्यालयातील  अधिकारी कंत्राटी तत्वावर काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहत नाही.  म्हणून कोमुनिदादमध्ये सरकारी कर्मचार्‍यांसारखे कायम अधिकारी नियुक्त केले जावेत, असे चोडणकर  म्हणाले. आल्वारो पद्धतीने जमिनी देण्याचा प्रकार असाच फसवा असून गरीबांच्या जमिनी हिरावून घेण्याचा प्रयत्न  आहे.  हे प्रकार थांबले पाहिजेत, असेही ते  म्हणाले.

यावेळी विल्बर्ट तिकलो म्हणालो, पर्वरी येथे कोमुनिदादच्या जागेतून तयार  करण्यात आलेला रस्ताही घोटाळ्याचा प्रकार असून सुमारे 5 कोटी रूपयांना फसवण्यात आले आहे. जे ना हरकत दाखले पुरविण्यात आले, तेही बनावट  आहेत. सेरूला कोमुनिदादला कोणताही फायदा झालेला नाही. असाच घोटाळा आसगाव आणि पिळर्ण कोमुनिदादमध्ये घडल्याचेही ते म्हणाले. यावेळी उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, विल्बर्ट तिकलो, अ‍ॅड. शंकर फडते व इतर उपस्थित होते.