Fri, Apr 19, 2019 12:27होमपेज › Goa › गोव्यासह देशात १० सहकारी शेती प्रकल्प 

गोव्यासह देशात १० सहकारी शेती प्रकल्प 

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 11:58PMफोंडा : प्रतिनिधी

जगातील इतर देशांपेक्षा भारतात शेती उत्पन्नात वाढ होत असल्याने शेतमालाची निर्यात केली जाते. मात्र कष्टकरी शेतकरी त्यांच्या मालाला योग्य दर मिळत नसल्याने  आत्महत्या करतात. शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार देशभरात 10 सहकार शेती प्रकल्प सुरू करणार असून गोव्यात असा एक प्रकल्प  लवकरच सुरू होईल,अशी  घोषणा केंद्रीय कृषी राज्य मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी केली.   एकाच छताखाली कृषी बाजार स्थापन करून शेतकर्‍यांना ऑनलाईन  सेवा देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे,असेही ते म्हणाले. 

कुर्टी फोंडा येथील गोवा राज्य कृषी विपणन मंडळाच्या कृषी बाजार या नव्यानेच बांधलेल्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या  उद्घाटनप्रसंगी केंद्रीय कृषी राज्यमंत्री शेखावत बोलत होते. खासदार नरेंद्र सावईकर, खासदार विनय तेंडुलकर, सरपंच रुक्मा खांडेपारकर, मंडळाचे अध्यक्ष उल्हास अस्नोडकर, सदस्य सुनील देसाई, किशोर शेट मांद्रेकर व सचिव हरिश्चंद्र गावडे व्यासपीठावर  होते.  केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक व कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी नाम फलकाचे अनावरण केले. त्यानंतर पूर्वनियोजित कामानिमित्त ते निघून गेले. 

मंत्री  शेखावत म्हणाले, देशाचा विकास शेतकर्‍यांमुळे होतो हे नाकारून चालणार नाही. मात्र शेतीबरोबरच पूरक व्यवसायांकडे लक्ष दिल्यास शेतीमुळे होणारा तोटा शेतकर्‍यांना अधिक जाणवणार नाही. शेतकर्‍यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीची जमीन कमी होत आहे. मात्र, नवीन तंत्रज्ञानामुळे शेतकर्‍यांना अधिक पीक घेता येते. देशभरातील शेतकर्‍यांना 2022 साला पर्यंत आवश्यक मोबदला देऊन समृद्ध करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना पूर्णत्वास येईल, याची खात्री असल्याचेही शेखावत यांनी सांगितले. 

खासदार नरेंद्र सावईकर यांनी सांगितले , की 2012 साली गोव्यातील खाणी बंद झाल्याने अनेकांनी शेतीकडे लक्ष दिले. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा खाणी बंद करण्याचा आदेश दिल्याने खाण अवलंबितांना पुन्हा शेतीकडे वळण्याची वेळ आली आहे. गोव्यातील शेतकर्‍यांनी काजू प्रमाणे बांबूचे पीक घेण्यास सुरुवात केल्यास सहकार क्षेत्रात  अधिक प्रगती होईल. गोव्यातील शेतकर्‍यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलण्याची गरज  आहे. 

खासदार विनय तेंडुलकर यांनी सांगितले,की केंद्र व  राज्यातील भाजप सरकार कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवित आहे. सरपंच  रुक्मा खांडेपारकर यांनी यावेळी आपले विचार मांडले. मंडळाचे अध्यक्ष उल्हास अस्नोडकर यांनी स्वागत केले. सुनील देसाई यांनी प्रास्ताविक केले. हरिश्चंद्र गावडे यांनी अहवाल वाचून दाखविला. किशोर शेट मांद्रेकर यांनी  आभार मानले. सूत्रसंचालन सुभाष जाण यांनी केले.