Sun, Jul 21, 2019 02:15होमपेज › Goa › ‘स्टार्ट अप’ गोव्याच्या प्रगतीचे इंजिन

‘स्टार्ट अप’ गोव्याच्या प्रगतीचे इंजिन

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 28 2018 11:59PMपणजी : प्रतिनिधी

मोपा विमानतळ प्रकल्पातील प्रत्येक  रोजगार हा गोमंतकीयांसाठी आरक्षित असेल. गोवा भविष्यातील  ‘स्टार्ट अप’ हब बनेल. राज्यात दरवर्षी ‘स्टार्ट अप’ जागतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. ‘स्टार्ट अप’ हे गोव्याच्या प्रगतीचे इंजिन आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

पणजी येथे आयोजित कार्यक्रमात राज्याच्या ‘स्टार्ट अप’ धोरणाची घोषणा केल्यानंतर ते बोलत होते.

मंत्री प्रभू म्हणाले की, ‘स्टार्ट अप’ धोरणाचा आरंभ करत असताना त्याविषयीच्या नवनवीन योजनाही   उपलब्ध आहेत.  देशभरात  20 हजार ‘स्टार्ट अप’ असल्याची अधिकृत आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात हा आकडा मोठा आहे. ‘स्टार्ट अप’द्वारे आपला व्यवसाय करणार्‍या उद्योजकांना प्राथमिक स्तरावर सहकार्य करणे गरजेचे आहे. गोव्यातील उभरत्या उद्योजकांना  सल्ला देण्यासाठी गोव्यात कॉल सेंटरची सुरवात करण्यात आली आहे. ‘स्टार्ट अप’मुळे देशात एकप्रकारची क्रांती घडणार आहे. 

मोपा विमानतळ प्रकल्पातील प्रत्येक रोजगार हा गोमंतकीयांसाठी आरक्षित  असेल. किनारी राज्यांपैकी मुंबईनंतर मोपा विमानतळ हा सर्वात मोठा विमानतळ असेल. 30 दशलक्ष प्रवासी हाताळण्याची या विमानतळाची क्षमता आहे. कार्गो हाताळणीही या विमानतळावरुन होईल. गोवा हे लॉजिस्टीक हब बनवण्यासाठी लवकरच आराखडा तयार केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, गोवा केवळ पर्यटन स्थळ नव्हे तर आयटी स्थळ म्हणून ओळखले जावे म्हणून सरकारकडून  पावले उचलण्यात येत आहेत. त्या दिशेने  धोरणे तयार केली जात आहेत. 2025 सालापर्यंत   गोव्याची  ओळख ‘स्टार्ट अप’ डेस्टीनेशन म्हणून आशिया खंडात व्हावी, यासाठी प्रयत्न आहे.  ‘स्टार्ट अप’ धोरण जाहीर करणारे गोवा हे देशातील चार राज्यांपैकी एक आहे. ‘स्टार्ट अप’मुळे केवळ गुतंवणूकदारच आकर्षित होणार असे नाही तर रोजगारांच्या संधीही मोठ्या प्रमाणात तयार होणार आहेत.

कार्यक्रमाला मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, तंत्रज्ञान विभागाचे सचिव अमेय  अभ्यंकर उपस्थित होते.