Fri, Jan 18, 2019 08:55होमपेज › Goa › ‘गोवा माईल्स’अ‍ॅपचा जुलैमध्ये प्रारंभ

‘गोवा माईल्स’अ‍ॅपचा जुलैमध्ये प्रारंभ

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 27 2018 12:16AMपणजी : प्रतिनिधी 

गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे बनवण्यात आलेल्या ‘गोवा माईल्स’ या टॅक्सी अ‍ॅपचा जुलै महिन्यात  प्रारंभ होणार आहे. सध्या हे अ‍ॅप चाचणीच्या अंतिम टप्प्यात असून राज्यातील एकूण 2  हजार 800 टॅक्सी चालकांनी या अ‍ॅपच्या वापरासाठी संमती दर्शविली आहे. ग्राहकांची अ‍ॅपसाठी पसंती  वाढल्यानंतर  टॅक्सी चालकांच्या संख्येतही वाढ होईल, अशी आशा महामंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्‍त केली आहे. 

पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर अ‍ॅपविषयी म्हणाले, की ‘गोवा माईल्स’ मुळे पर्यटकांना वाहतुकीचेच पर्याय शोधणे  सुलभ होणार आहे. या अ‍ॅपमुळे टॅक्सी  सेवेत लक्षणीय बदल घडणार असून टॅक्सी चालक, पर्यटक तसेच स्थानिकांना याचा लाभ होईल. राज्यातील टॅक्सी चालक अन्य  राज्यांच्या तुलनेत मागे न राहता सदर अ‍ॅप वापरतील, अशी खात्री आहे. 

जीटीडीसीचे अध्यक्ष निलेश काब्राल म्हणाले, या अ‍ॅपविषयी लोकांमध्ये जागृतीसाठी महामंडळातर्फे सार्वजनिक माहिती मोहीम राबविली जाईल. जागरूकतेनंतर  लोक मोठ्या प्रमाणात हे अ‍ॅप डाऊनलोड करतील, अशी अपेक्षा आहे. 

राज्यात डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना, पर्यटकांना चांगल्या सोयी तसेच टॅक्सी चालकांना चांगले उत्पन्न मिळवुन देणे हाच अ‍ॅप चा मुख्य उद्देश आहे. हे अ‍ॅप ग्राहकांना डिजिटल अनुभवाबरोबरच टॅक्सी चे भाडे देखील सुलभ व सुरक्षित करणारा आहे. तसेच टॅक्सी चालकांच्या खिशाला चिमटा न काढता हे अ‍ॅप ग्राहकांच्या जलद व सोयीस्कर वापरासाठी  बनविण्यात आले आहे,असे सांगण्यात आले. 

अ‍ॅपचे व्यवस्थापकीय संचालक उत्कर्ष दाभाडे म्हणाले, ग्राहक गोवा माईल्स हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड व आयओएसवरून विनाशुल्क डाऊनलोड करता  येईल. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना आपल्याला किती पैसे द्यायचे आहेत व आपण कुठे जात आहोत, यासंदर्भात माहिती मिळणार आहे. प्रवासात ग्राहकाचे काही सामान विसरले असेल, तर हे अ‍ॅप त्यांना टॅक्सी चालकाविषयी माहिती देणार आहे. प्रवाशी ज्यावेळी अ‍ॅप व्दारे टॅक्सी मागवतील त्यावेळी त्यांच्या जवळच्या अंतरावर असलेल्या टॅक्सीला याबाबत माहिती मिळेल व या प्रवाशाचे भाडे सदर टॅक्सी चालक घेईल, असेही या पत्रकात  म्हटले आहे.