Sat, Mar 23, 2019 12:01होमपेज › Goa › वीजमंत्री मडकईकर यांना ‘ब्रेन स्ट्रोक’; मुंबईत उपचार

वीजमंत्री मडकईकर यांना ‘ब्रेन स्ट्रोक’; मुंबईत उपचार

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 12:30AMपणजी : प्रतिनिधी

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना ‘ब्रेन स्ट्रोक’ झाला असून त्यांच्यावर मुंबईतील कोकिळाबेन अंबानी इस्पितळात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना पुढील 72 तास वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले. 

मडकईकर सोमवारी गोव्याहून मुंबईला गेले असता त्यांना रात्री हॉटेलात अस्वस्थ वाटू लागले. यामुळे आधी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वाटून मुंबईच्या कोकिळाबेन इस्पितळात भरती करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी करून त्यांना ‘ब्रेन स्ट्रोक’ झाल्याचे निदान केले. मडकईकर यांच्या मेंदूतील वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या असल्याचे समजल्यावर मंगळवारी सकाळी त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून मडकईकर उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती राणे यांनी दिली. 

आरोग्यमंत्री राणे यांना मडकईकरांच्या आजाराची माहिती मिळताच मंगळवारी सकाळी गोेमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर यांना सोबत घेऊन ते मुंबईला रवाना झाले. गोमेकॉचे काही डॉक्टरही मडकईकर यांच्यावरील उपचारांची माहिती घेण्यासाठी मंगळवारी उशिरा मुंबईला रवाना झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी संपर्क साधून मडकईकर यांच्यावरील उपचारात लक्ष घालण्याची विनंती केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.