Tue, Apr 23, 2019 01:48होमपेज › Goa › महिलांसाठी ‘181’ हेल्पलाईन कार्यान्वित 

महिलांसाठी ‘181’ हेल्पलाईन कार्यान्वित 

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 11 2018 12:13AMपणजी : प्रतिनिधी

राज्याच्या कोणत्याही भागातील महिला व युवतींना अडचणीच्या वेळी ‘181’ या हेल्पलाईन क्रमांकावर मदत मिळू शकते. महिलांवर होणारे अत्याचार, घरगुती हिंसा, बलात्कार, हुंडाप्रकरणी छळ, स्त्रीभ्रूण हत्या, शोषण, विनयभंग तसेच कार्यालयातील छळवणूक आदी तक्रारींसाठी या ‘टोल फ्री 181’ हा  हेल्पलाईन क्रमांक 24 तास उपलब्ध असेल, असे महिला व बालकल्याण खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले. 

येथील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात महिला व बालकल्याण खात्यातर्फे आयोजित कार्यक्रमात ‘181’ हेल्पलाईन क्रमांकांचे मंत्री राणे यांच्या हस्ते उद्घाटन  करण्यात आले. महिलांच्या मदतीसाठी दोन खास वाहने सेवेत दाखल करण्यात आली. 

राणे म्हणाले, की सदर ‘181 ’ क्रमांक डायल करून माहिती दिल्यानंतर पीडित महिलेला सरकारतर्फे समस्या निवारणासाठी मदत केली जाणार आहे.    हा हेल्पलाईन क्रमांक ‘टोल फ्री 108’ च्या धर्तीवर सुरू राहणार आहे. या क्रमांकाची देखभाल ‘जीव्हीके- इएमआरआय’ ही कंपनी करणार आहे. या क्रमांकाचा नियंत्रण कक्ष बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील जीव्हीके इएमआरआयच्या कार्यालयात असणार आहे. महिलांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर समस्येनुसार त्यांना मदत केली जाणार आहे.       

संकटात सापडलेल्या महिलांनी 181 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांची मदत उपलब्ध केली जाईल. त्यानंतर कायदेशीर सल्ला, मानसिक समुपदेशन आणि वैद्यकीय उपचारांचीही सोय केली जाणार आहे,असे गोवा विद्यापीठाच्या महिला अभ्यास विभागाच्या प्रमुख प्रा. शैला डिसोझा यांनी सांगितले. यावेळी विशेष अधिकारी डॉ. राजनंदा देसाई, संचालक डॉ. संजीव देसाई, डीन डॉ. प्रदीप नाईक, महिला व बाल कल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई, अतिरिक्त संचालक दीपाली नाईक  आदी उपस्थित होते.