पैकीच्या पैकी गुण मिळवताना...

Last Updated: Mar 02 2020 8:10PM
Responsive image


अपर्णा देवकर

प्रत्येक परीक्षार्थीला आपल्याला चांगले गुण किंवा पैकीच्या पैकी गुण मिळावेत, अशी इच्छा असते. त्यासाठी तो तयारी देखील करत असतो. अर्थात हे गुण परीक्षक देत असतात. प्रत्येकाची गुण देण्याची पद्धत वेगळी असू शकते. मात्र, परीक्षक कोणत्या आधारावर गुण देतात, हे जर ओळखले तर त्यानुसार आपण लिहण्याचा प्रयत्न करू शकतो. एखादी उत्तरपत्रिका कशी तपासली जाते आणि गुण कसे दिले जातात, याचे आकलन करू या. 

उत्तरपत्रिकेवर गुप्त क्रमांक : दहावी असो किंवा बारावीच्या उत्तरपत्रिका  देशभरातील केंद्रांवर तपासणीसाठी पाठविल्या जातात. यासाठी विविध शाळेतील अनुभव शिक्षकांची नियुक्ती केली जाते. प्रत्येक शिक्षकाला प्रति उत्तरपत्रिकेनुसार मानधन दिले जाते. उत्तरपत्रिका पाठवताना उत्तरपत्रिकेवरून नाव आणि रोलक्रमांकाचे पान काढून घेतले जाते. त्याठिकाणी गुप्त क्रमांक दिला जातो. या क्रमांकाची माहिती केवळ मंडळाच्या कर्मचार्‍यांना असते. या आधारावर उत्तरपत्रिका तपासताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. 

गुण देण्याची पद्धत : उत्तरपत्रिकांची तपासणी करणार्‍या शिक्षकांना एक गुण देण्याची पद्धत सांगितली जाते. या गुणाच्या पद्धतीत प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरासाठी कसे आणि कोणत्या मुद्द्यावर गुण द्यावेत याचे निकष दिलेले असतात. निकषात बसणारे अपेक्षित उत्तर आल्यास परीक्षक संपूर्ण गुण देतो. 

जादा लिखाणाचा लाभ नाही : काही विद्यार्थी उगाचच अवांतर लिहण्याच्या मोहात पडतात. अधिक लिहल्याने जादा गुण पडतात, असा त्यांचा समज असतो. परिणामी या भ्रमात राहिल्याने काही विद्यार्थी संपूर्ण पेपर सोडवू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे अचूक आणि मुद्देसुद उत्तर लिहणे गरजेचे आहे. पाल्लाळ आणि अलंकारिक भाषेचा वापर करून वेळेचा अपव्यय करू नये. 

उत्तर देण्याची शैली महत्त्वाची : जो विद्यार्थी योग्य मथळा, उपशिर्षक, मुद्दे, आकृतीचा वापर करून उत्तर लिहतो त्याला पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची शक्यता अधिक राहते. जर उत्तर लिहताना मोठमोठे पॅराग्रॅफ असेल तर शिक्षकांचा उत्तर शोधताना वेळ जावू शकतो. या आधारावर परीक्षकांना महत्त्वाचे मुद्दे सापडणार नाहीत आणि त्याचा परिणाम गुणांवर होऊ शकतो. त्यामुळे काही वेळा परीक्षक सरासरी गुण देऊन पुढच्या प्रश्नांकडे वळतात. उत्तर घाईगडबडीत लिहल्याने आणि त्याची मांडणी अचूक न केल्याने त्याचा फटका बसतो. शेवटी उत्तर येऊनही गुणांवर पाणी सोडावे लागते. म्हणून गुण हे उत्तर देण्याच्या शैलीवर अवलंबून असतात.

प्रत्येक पायरीला गुण : सीबीएसई असो किंवा एसएससी बोर्डाचे पेपर असो, उत्तरातील प्रत्येक पायरीला गुण असतात. उत्तर लिहताना एकही पायरी चुकता कामा नये. कदाचित उत्तर चुकले तरी पायर्‍याच्या आधारावर गुण मिळू शकतात. एवढेच नाही तर पायर्‍या चुकल्या आणि उत्तर जर बरोबर असेल तरीही परीक्षक पूर्ण गुण देताना विचार करतो.